आयपीएल वेळापत्रकाची घोषणा, पाहा कधी आहेत मुंबईच्या मॅच

२०१९ सालच्या आयपीएलच्या पहिल्या २ आठवड्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Feb 19, 2019, 05:06 PM IST
आयपीएल वेळापत्रकाची घोषणा, पाहा कधी आहेत मुंबईच्या मॅच title=

मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलच्या पहिल्या २ आठवड्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकींमुळे यंदाच्या वेळी संपूर्ण आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली नाही. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर बीसीसीआयनं आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केली. पहिल्या २ आठवड्यांमध्ये २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान १७ सामने खेळवण्यात येतील. यंदाच्या आयपीएलची पहिली मॅच चेन्नई आणि बंगळुरूच्या टीममध्ये रंगेल.

आयपीएलच्या या वेळापत्रकानुसार ८ ठिकाणी प्रत्येकी २ मॅच होणार आहेत. तर दिल्लीमध्ये ३ सामने खेळवण्यात येतील. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक टीम कमीत कमी ४ मॅच खेळणार आहे. तर दिल्ली आणि बंगळुरू ५ मॅच खेळणार आहेत. दिल्लीची टीम घरच्या मैदानात ३ आणि बंगळुरूची टीम बाहेरच्या मैदानात ३ सामने खेळेल. उरलेल्या टीम घरी २ आणि बाहेरच्या मैदानात २ सामने खेळतील.

असे असतील मुंबईचे सामने

मागच्या मोसमामध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या मुंबईच्या टीमला यावर्षी त्यांचा खेळ सुधारण्याचं आव्हान असेल. यंदाच्या वर्षी मुंबई त्यांचा पहिला सामना २४ मार्चला खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध ही मॅच होईल

२४ मार्च- मुंबई विरुद्ध दिल्ली- वानखेडे स्टेडियम

२८ मार्च- बंगळुरू विरुद्ध मुंबई- चिन्नास्वामी स्टेडियम

३० मार्च- पंजाब विरुद्ध मुंबई- मोहाली स्टेडियम

३ एप्रिल- मुंबई विरुद्ध चेन्नई- वानखेडे स्टेडियम

अशी आहे मुंबईची टीम

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ, युवराज सिंह, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जासवाल, राशिख सलाम

यंदाच्या वर्षी संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांवर उरलेलं वेळापत्रक अवलंबून असेल. २३ मार्चला चेन्नई आणि बंगळुरूमध्ये चेन्नईच्या मैदानात पहिला सामना रंगेल. तर आयपीएलची फायनलही चेन्नईमध्येच होईल.