नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जाऊन दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापाड झाला. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठीची जागा, वेळ आम्ही ठरवू, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं मात्र इम्रान खान यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. जागा, वेळ आणि तुमचं भविष्य आम्ही ठरवलं, असं ट्विट गौतम गंभीरनं केलं आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सकाळी ३.३० वाजता पाकिस्तानच्या बालाकोटमधल्या तीन दहशतवादी तळांवर भारतीय वायुसेनेच्या १२ मिराज-२००० फायटर जेट्सनी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय वायुसेनेनं एक हजार किलो बॉम्ब टाकले. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली. यानंतर भारतानं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला करून पुलवामाचा बदला घेतला.


भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर सुरक्षा समितीनं भारतानं बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हल्ल्याचा पाकिस्ताननं इन्कार केला. तसंच भारताच्या आक्रमकतेला आम्ही प्रत्युत्तर देऊ, अशी दर्पोक्ती पाकिस्ताननं केली.