वेस्ट इंडिजचा १२७ रनवर ऑल आऊट, भारताला विजयासाठी ७२ रनची गरज
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचा १२७ रनवर ऑल आऊट झाला आहे.
हैदराबाद : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचा १२७ रनवर ऑल आऊट झाला आहे. यामुळे भारताला दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी ७२ रनची आवश्यकता आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या उमेश यादवनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाला ३ विकेट मिळाल्या. आर. अश्विननं २ आणि कुलदीप यादवनं १ विकेट घेतली. वेस्ट इंडिजच्या सुनिल अॅम्ब्रिसनं सर्वाधिक ३८ रन केले.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं ३०८-४ अशी केली होती. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पंत ८५ रनवर तर रहाणे ७५ रनवर खेळत होता. पण त्यांना शतक करता आलं नाही. पंत ९२ रनवर तर अजिंक्य रहाणे ८० रनवर आऊट झाला. यानंतर अश्विननं ३५ रनचं मोलाचं योगदान देऊन भारताला ५६ रनची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं सर्वाधिक ५ विकेट घेतल्या तर शॅनन गॅब्रियलला ३ आणि जोमेल वॉरिकनला २ विकेट मिळाल्या.
२ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं याआधीच जिंकली आहे. आता दुसरी टेस्ट जिंकूनही वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश करण्याची संधी भारतीय टीमला आहे.