`यापेक्षा गल्ली क्रिकेट बरं,` वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी चक्क टेम्पो, VIDEO पाहून क्रिकेट चाहत्यांचा संताप
नेपाळमध्ये (Nepal) पोहोचलेल्या वेस्ट इंडिज (West Indies) संघावर आपलं सामान स्वत: टेम्पोत ठेवण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत असून, काहीजण यात काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे.
वेस्ट इंडिजचा 'अ' संघ नेपाळमध्ये दाखल झाला आहे. नेपाळमध्ये वेस्ट इंडिज नेपाळविरोधात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. 27 एप्रिलला किर्तीपूर येथे पहिला सामना खेळला जाणार आहे. पण वेस्ट इंडिज संघ नेपाळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं स्वागत पाहून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याचं कारण वेस्ट इंडिज संघ काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी चक्क टेम्पो उभा होता. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या टेम्पोत वेस्ट इंडिजचे खेळाडू स्वत: आपलं सामान उचलून ठेवत होते.
वेस्ट इंडिज खेळाडू विमानतळाबाहेर आपलं सामान उचलून टेम्पोत ठेवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत खेळाडू एका हेल्परच्या मदतीने बॅग, सुटकेस टेप्मोत ठेवत असल्याचं दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक क्रिकेटचाहते त्यावर व्यक्त होत आहेत. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीनी नेपाळच्या वाईट व्यवस्थापनावर टीका केली आहे, तर काहींनी सामान टेम्पोतून नेण्यात काही चूक नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, रोस्टन चेस हा वेस्ट इंडिज 'अ' संघाचा कर्णधार असेल तर ॲलिक अथनाझे उपकर्णधाराची भूमिका बजावेल. वेस्ट इंडिज 'अ' संघ नेपाळनिरोधात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून तयारीसाठी ही मालिका उपयोगाची ठरणार आहे. वेस्ट इंडिज संघाचा हा पहिलाच नेपाळ दौरा आहे.
रोस्टन चेस पहिल्यांदाच या पातळीवर संघाचं नेतृत्व करणार आहे. चेसच्या कर्णधारपदी निवडीवर भाष्य करताना, CWI चे मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स यांनी चेसच्या मेहनती आणि नेतृत्व कौशल्याच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनाचा उल्लेख केला.
"चेसने गेल्या काही वर्षांत प्रभावी नैतिकता आणि नेतृत्व गुणांचे प्रदर्शन केलं आहे. चेसने ऑक्टोबर 2021 मध्ये T20I त बांगलादेशविरोधीतील सामन्यातून पदार्पण केल्यापासून वेस्ट इंडिजसाठी चांगली कामगिरी सुरु ठेवली आहे," असं अधिकाऱ्याने सांगितलं.