वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूने क्रिकेटच्या देवाकडे मागितली मदत
`या` दिग्गज खेळाडूचं मदतीसाठी थेट क्रिकेटच्या देवाला साकडं
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव आहे, याची प्रचिती अनेकदा आली आहे. याच क्रिकेटच्या देवाकडे आता वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूने मदतासाठी धाव घेतली आहे. नेमकी या खेळाडूला काय मदत हवी आहे व या खेळाडूवर क्रिकेटच्या देवाकडे मदत मागण्याची वेळ का आली ते जाणून घेऊयात.
सचिन तेंडुलकरला आपल्या धारदार गोलंदाजीने अडचणीत आणणाऱ्या वेस्ट इंडिजचा विन्स्टन बेंजामिन हा खुप प्रसिद्ध गोलंदाज होता. या दिग्गज खेळाडू बेंजामिनने आता सचिनला मदतीची विनंती केली आहे. वेस्ट इंडिजचा विन्स्टन बेंजामिन हा सचिन आणि माजी दिग्गज मोहम्मद अझरुद्दीनला आपला मित्र म्हणून संबोधतो.
बेंजामिन हे स्थानिक खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि तेथील क्रिकेटच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना क्रिकेट साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बेंजामिनने सचिन तेंडुलकर तसेच टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळणाऱ्या नामांकित क्रिकेटपटूंची मदत मागितली आहे.
क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्या यूट्यूब चॅनलवर वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूने सांगितले की, मला क्रिकेट साहित्यासाठी मदत करणारे लोक हवे आहेत. मला हजारो डॉलर्स नको आहेत, पण कोणीतरी 10-15 बॅट पाठवाव्यात. माझ्यासाठी ते खूप आहे. मला साहित्य मिळाले तर मी ते इथल्या तरुणांमध्ये वितरित करू शकेन, असे तो म्हणतो.
ते पुढे म्हणतात, 'मिस्टर सचिन तेंडुलकर, तुम्ही या पदावर असाल तर मला मदत करा. मी माझा मित्र मोहम्मद अझरुद्दीन यांचेही आभार मानू इच्छितो. त्यांनी काही साहित्यही पाठवले. त्याबद्दल त्यांचे आभार. या व्हिडिओ मेसेजमध्ये बेंजामिनने त्याचा फोन नंबरही शेअर केला आहे जेणेकरून सचिन किंवा इतर कोणीही त्याच्याशी संपर्क करू शकेल.