दुबई : एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज. १९७५ आणि १९७९चे लागोपाठ दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकले. पण याच टीमवर २०१९ सालचा वर्ल्ड कप न खेळण्याची नामुष्की ओढावू शकते. वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय करण्यासाठी आता वेस्ट इंडिजला क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४ मार्च ते २५ मार्चदरम्यान झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायर मॅच खेळवण्यात येणार आहेत. या क्वालिफायर मॅचमध्ये वेस्ट इंडिजबरोबर अफगाणिस्तान, आयर्लंड, झिम्बाब्वे, हाँगकाँग, नेदरलँड, स्कॉटलंड आणि पपुआ न्यूगिनी या आठ टीम सहभागी होतील. तर इतर दोन टीमची निवड ८ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नामिबियामध्ये होणाऱ्या विश्व क्रिकेट लीग डिव्हिजन दोन मॅचमधून होईल. या लीगमध्ये कॅनडा, केनिया, नामिबिया, नेपाळ, ओमान आणि युएईच्या टीम खेळणार आहेत. 


३० सप्टेंबर २०१७च्या आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये टॉप ८ टीममध्ये नसल्यामुळे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या देशांना क्वालिफायर मॅच खेळाव्या लागणार आहेत.


आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये भाग घेणाऱ्या टीमचा पाच-पाचचा ग्रुप बनवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज, आयर्लंड, नेदरलँड, पपुआ न्यूगिनी आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग डिव्हिजन दोनमध्ये जिंकलेली टीम ए ग्रुपमध्ये आणि अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग आणि विश्व क्रिकेट लीग डिव्हिजन दोनमधली उपविजेती टीम ग्रुप बीमध्ये असतील.


आयसीसी क्रिकेट क्वालिफायरच्या ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळेल. यानंतर ग्रुप स्टेजमधल्या टॉप ३ टीम सुपर सिक्समध्ये जातील. ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांविरुद्ध न खेळलेल्या टीममध्ये सुपर सिक्सचे सामने होतील आणि फायनलमध्ये गेलेल्या टीमला २०१९चा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळेल.