ग्रॉस आयलेट : वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या २ टेस्ट गमावल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. कर्णधार जो रूटच्या शतकाच्या मदतीनं इंग्लंड तिसऱ्या टेस्टमध्ये मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ३२५/४ एवढा स्कोअर केला होता. आता इंग्लंडकडे ४४८ रनची आघाडी आहे. इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये २७७ रन केले होते. यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्टइंडिजला १५४ रनपर्यंतच मजल मारता आली. या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला तरी त्यांनी सीरिज आधीच गमावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोर रूटनं त्याच्या शतकी खेळीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे. जो रूटनं ८० टेस्टच्या १४७ इनिंगमध्ये ६,६७४ रन केल्या आहेत. तर विराटनं ७७ टेस्टच्या १३१ इनिंगमध्ये ६,६१३ रन केल्या आहेत. रनच्या बाबतीत विराट कोहली जो रुटच्या मागे पडला असला, तरी शतकांच्याबाबतीत मात्र विराट बराच पुढे आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर २५ शतकं आणि जो रूटच्या नावावर १६ शतकं आहेत. टेस्टमध्ये विराटची सरासरी ५३.७६ आणि जो रूटची सरासरी ४९.८० आहे. अर्धशतकांच्याबाबतीत जो रूट विराटच्या बराच पुढे आहे. रूटनं आत्तापर्यंत ४१ अर्धशतकं तर विराटनं २० अर्धशतकं केली आहेत.


वेस्टइंडिजविरुद्ध १२३ रनची आघाडी घेणाऱ्या इंग्लंडनं तिसऱ्या दिवसाची सुरुवात १९/० अशी केली होती. तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं फक्त ४ विकेट गमावल्या. रोरी बर्न्सच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का लागला. कीमो पॉलनं बर्न्सची विकेट घेतली. पायाला दुखापत झाल्यामुळे कीमो पॉलला मैदान सोडावं लागलं.


किटन जेनिंग्स २३ रनवर जोसेफचा शिकार झाला. पहिल्या २ विकेट गेल्यानंतर जो रूटनं इंग्लंडची खेळी सावरली. रूट सध्या २०९ बॉलमध्ये १११ रनवर नाबाद खेळत आहे. रूटच्या या खेळीमध्ये ९ फोरचा समावेश आहे. रूटनं तिसऱ्या विकेटसाठी जो डेनली(६९रन) सोबत ७४ रनची, यानंतर चौथ्या विकेटसाठी जॉस बटलर(५६ रन) बरोबर १०७ रनची भागीदारी केली. सध्या जो रूट आणि बेन स्टोक्स (नाबाद २९ रन) यांच्यामध्ये ७१ रनची नाबाद भागीदारी सुरू आहे.