Rohit sharma: जे लिहून ठेवलं ते घडणारच पण...; वर्ल्डकप विजयानंतर असं का म्हणाला रोहित?
Rohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित म्हणाला की, मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी मनातून करण्याचा प्रयत्न करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही.
Rohit sharma: इंडियन क्रिकेट टीमने आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीचीही घोषणा केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने म्हटलंय की, माझा विश्वास आहे की, जे लिहून ठेवलंय ते घडूनचं राहणार. आणि वर्ल्डकप जिंकणं हे लिहून ठेवलं होतं. फक्त मॅचपूर्वी तुम्हाला माहिती नसतं की, हेच लिहून ठेवलंय आणि हाच खरा खेळ असतो
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, अंतिम सामन्यानंतर निवृत्त होण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी T20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेईन असं वाटलं नव्हतं मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली आणि निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे असं मला वाटलं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर निरोप घेण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. परंतु मी नक्कीच आयपीएल खेळत राहणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित म्हणाला की, मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी मनातून करण्याचा प्रयत्न करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही. गेल्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतर मी हा वर्ल्डकप खेळणार की नाही याचा विचारही केला नाही.
सात महिन्यांपूर्वी भारताने घरच्या मैदानावर वनडे वर्ल्डकप जिंकला असता तर तो टी-20 पूर्वी निवृत्त झाला असता का? या प्रश्नावर रोहित म्हणाला की, मी टी-20मधून निवृत्ती घेईन, असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे असे मला वाटलं. यावेळी जे काही लिहिलं जातं ते घडतं.
चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगल्या गोष्टी घडतात. त्यामुळे आता तुम्ही सांगितलंय म्हणजे मी चांगलाच असणार, असं हसत हसत रोहित म्हणाला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमचा इतिहास
सर्व T20 वर्ल्डकप खेळणारा रोहित शर्मा सध्या एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो 2007 च्या T20 वर्ल्डकप टीमचा भाग होता. त्यानंतर आता 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीमने ही स्पर्धा जिंकली. रोहित शर्माने त्याच्या अफाट कारकिर्दीत एकूण 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 4231 रन्स केले. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक 5 शतकांचा विक्रमही आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकूण 32 अर्धशतकं झळकावली आहेत.