Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करतेय. लीग स्टेजमध्ये टीम इंडियाने 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर आता टीम इंडियाला सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा प्लान कसा असणार आहे, यावर रोहित शर्माचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 20 जूनपासून T20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 चा प्रवास सुरू करणार आहे. या दिवशी टीम इंडियाचा सामना राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानशी होणार आहे. सुपर 8 च्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी चांगला सराव केला. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा इशारा केला आहे. रोहितच्या म्हणण्यानुसार, वेस्ट इंडिजची खेळपट्टी कशी आहे हे आमच्या खेळाडूंना माहितीये. 


काय असू शकतो रोहित शर्माचा प्लॅन?


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएचा पराभव केला. आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजच्या पीचचा विचार करून टीमच्या प्लेइंग-11 मध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यापैकी एकाची जागा घेऊन युझवेंद्र चहलला प्लेइंग-11 मध्ये स्थान देऊ शकेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे तो मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून काढून कुलदीप यादवलाही संधी देऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपसह हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत दिसू शकतो. तर शिवम दुबेलाही गोलंदाजी दिली जाऊ शकते.


प्रॅक्टिस सेशन दरम्यान काय म्हणाला रोहित?


रोहित म्हणाला, 'हा ग्रुप खूप चांगला आहे, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठी ही चांगली सुरुवात असणार आहे. आम्ही प्रत्येक सराव सत्र अतिशय गांभीर्याने घेतोय. प्रत्येकजण त्यांच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतोय. प्रत्येक सेशनमधून खेळाडूंना काहीतरी फायदा होत आहे. आम्ही आमचा पहिला सामना खेळू आणि दोन ते चार दिवसांत आम्हाला आमचे पुढील दोन सामने खेळायचे आहेत. हे काही प्रमाणात हेक्टिक असणार आहे. पण आपल्याला या सगळ्याची सवय झाली आहे. आम्ही खूप प्रवास करतो आणि बरेच सामने खेळतो त्यामुळे ही गोष्ट कोणत्याही प्रकारचा बहाणा होऊ शकत नाही. 


रोहित शर्मा पुढे म्हणाला, आम्ही याठिकाणी बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे कसं खेळायचं आणि निकाल आमच्या बाजूने कसा वळवायचा हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येकजण पुढे काय आहे याबद्दल खूप उत्सुक आहोत.