सिडनी : चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर सिडनी येथे सुरु असलेल्या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताला ६०० पेक्षा अधिक धावा करता आल्या. भारताचा पहिला डाव ६२१ धावांवर घोषित करण्यात आला. यानंतर खेळायला आलेल्या ऑस्ट्रलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपला. यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला परत खेळण्यासाठी आमंत्रण देत, फॉलोऑन दिला. चौथ्या दिवशी दुसरा डाव खेळायला आलेल्या ऑस्ट्रेलियासमोर पराभवाची नामुष्की ओढवलेली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही शून्य बाद ६ अशी होती. विद्युत प्रकाशाच्या समस्येमुळे खेळात अनेकदा अडथळा आला. उद्या कसोटीचा शेवटचा दिवस आहे. यामुळे ही कसोटी अनिर्णित राहिल किंवा ऑस्ट्रेलियाचा पराभव तरी होणार हे, चित्र स्पष्ट झाले आहे. 


ऑस्ट्रेलियाला ३१ वर्षांनी फॉलोऑन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाला भारताने फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजी करण्यास भाग पाडले. याआधी १९८८ साली २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन मिळाला होता. म्हणजेच तब्बल ३१ वर्षानंतर आपल्या देशात ऑस्ट्रेलिया फॉलोऑन घेऊन खेळत आहे. १९८८ सालच्या त्या सामन्यात फॉलोऑन घेऊन खेळताना ऑस्ट्रेलिया संघाला ही कसोटी वाचवण्यात यश आलं होतं. हा सामना अनिर्णित राहिला होता. 


भारताकडून ३३ वर्षांनी फॉलोऑन, इतिहासाची पुनरावृत्ती


याआधी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यांच भूमीवर १९८६ साली म्हणजेच ३३ वर्षांआधी फॉलोऑन दिला होता. विशेष म्हणजे याच सिडनी ग्राउंडवर भारताने हा फॉलोऑन दिला होता. या सामन्यात भारताने ४ विकेटच्या मोबदल्यात ६०० धावा केल्या होत्या. यात सुनील गावस्कर यांनी १७२, मोहिंदर अमरनाथ यांनी १३८ तर के श्रीकांत यांनी ११६ धावा केल्या होत्या. या तिघांच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन घेऊन खेळावं लागलं होतं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३९६ धावा केल्या होत्या. फॉलोऑन मिळाल्यानंतर देखील ऑस्ट्रेलियाने ही कसोटी अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले. 


भारताची मोठी आघाडी


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्यांच्या देशात मिळवलेली ही सर्वात मोठी आघाडी ठरली आहे. याआधी भारताने कोलकाता येथे १९९८ ला झालेल्या कसोटी सामन्यात भारताने ४०० धावांची आघाडी मिळवली होती. एकूणच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्यांदा मिळवलेली मोठी आघाडी ठरली आहे.


फॉलोऑन दिल्यानंतरही पराभव


 अनेकदा प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन दिला की, त्यांचा पराभव हा जवळपास निश्चित समजला जातो. पण याउलट ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन दिल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया हा असा एकमेव संघ आहे, ज्याने प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन दिल्यांनतरही पराभवाचा सामना करावा लागला आहे. फॉलोऑन स्वीकारल्यानंतर दोन संघाना विजय मिळवता आला आहे यात भारतीय आणि इंग्लंड संघाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला दिलेला फॉलोऑन स्वीकारल्यानंतरदेखील, १८९४ आणि १९९८ ला कसोटी सामना जिंकला होता. तर २००१ ला कोलकाता येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.