Mohammed Shami Dhoni Retirement Strategy:  भारताला एक दोन नाही तर तब्बल तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. खरं तर धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजीच अंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. मात्र धोनी दरवर्षी इंडियन प्रिमिअर लिगमध्ये म्हणजेच आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनी यंदाच्या पर्वात म्हणजेच 2024 लाही आयपीएल खेळला. मात्र त्याने निवृत्तीची घोषणा केली नाही. त्यामुळेच धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील गूढ अजूनही कायम आहे. मात्र धोनीचा संघ सहकारी असलेल्या मोहम्मद शामीने धोनीच्या निवृत्तीसंदर्भातील विचारसणीबद्दल भाष्य करताना क्रिकेटमधून बाहेर पडण्यासंदर्भात कॅप्टन कूल कसा विचार करतो हे सांगितलं आहे.


निवृत्ती कधी घ्यावी? धोनी म्हणतो...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलवरील 'अनप्लग्ड' या कार्यक्रमात बोलताना शमीने धोनीच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केलं. "तुम्ही त्याच्या भविष्यासंदर्भात वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत असता. मात्र तो स्वत: यावर बोलताना 'बघता येईल' असं सांगतो," असं म्हणत शमीने धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया नोंदवली. पुढे बोलताना शमीने, "मी माही भाईबरोबर यासंदर्भात चर्चा केली. एखाद्या खेळाडूने कधी निवृत्त झालं पाहिजे? असं मी त्याला विचारलं होतं. त्यावर त्याने, 'पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तो स्वत: खेळायला कंटाळेल तेव्हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला लाथ पडणार (निवड समिती किंवा संघ व्यवस्थापन संघातून हकालपट्टी करणार) आहे असं वाटेल तेव्हा' असं उत्तर त्याने दिलं होतं," असं सांगितलं. यावरुनच आता धोनी कधी निवृत्त होणार हे स्पष्ट होत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. धोनीचं कतृत्व पाहता यापैकी पहिल्या पद्धतीने तो क्रिकेटमधून बाहेर पडेल अशी शक्यता चाहत्यांनी व्यक्त केली आहे.


नक्की वाचा >> 'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..'


...तेव्हा निवृत्तीची वेळ आलीय असं समजावं


"पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खेळचा आनंद घेता येत नसेल तर तुम्हाला समजायला हवं की तुमचा निवृत्तीचा वेळ जवळ आला आहे. अशावेळी योग्य वेळ पाहून तुम्हीच निवृत्तीचा निर्णय घ्यावा. कारण अशावेळी तुमचं शरीर तुम्ही एका ठराविक पद्धतीने मेंटेन केलं नाही तर साथ देत नाही. हाच तो वेळ असतो तेव्हा खेळाडूने निवृत्तीबद्दल विचार करावा," असं शमीने सांगितलं.


नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'


धोनीची कामगिरी


धोनी हा सर्वकालीन सर्वोत्तम विकेटकीप-बॅट्समनपैकी एक आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धोनीने एकूण 17 हजार 266 धावा केल्या असून त्याची सरासरी 44.96 इतकी आहे. त्याने 16 शतकं आणि 108 अर्थशतकं झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 224 इतकी आहे. 


सगळ्या ट्रॉफी जिंकून दिल्या


धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीमध्ये अव्वल ठरला. धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने 2007 साली खेळवण्यात आलेला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला. 2011 मध्ये भारताने एकदिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर धोनी कॅप्टन असतानाच भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 ही स्पर्धा जिंकली. आयसीसीचे सर्व चषक जिंकणारा तो पहिला कॅप्टन ठरला.