'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'

Mohammed Shami Slams Virat Kohli Ravi Shastri: भारतीय संघासंदर्भात भाष्य करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उघडपणे आपला संताप व्यक्त करताना स्वत:च्या कामगिरीचा संदर्भही दिला. शमीने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 20, 2024, 12:22 PM IST
'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..' title=
एका मुलाखतीत व्यक्त केली खंत

Mohammed Shami Slams Virat Kohli Ravi Shastri: एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपबद्दल बोलायचं झालं तर भारताचा वेगवान मोहम्मद शमी हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. कोणत्याही भारतीय गोलंदाजाने वर्ल्ड कपमध्ये शमी इतक्या विकेट्स घेतलेल्या नाहीत. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये तब्बल 55 विकेट्स घेतल्या असून हा एक अनोखा विक्रम आहे. आशियामधील कोणत्याही गोलंदाजाने वर्ल्ड कपमध्ये घेतलेल्या या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक विकेट्स असून वर्ल्ड कपच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा शमी हा केवळ पाचवा गोलंदाज आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये चार वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा शमी हा जगातील एकमेव गोलंदाज आङे. असं असतानाही मागील तीन वर्ल्ड कपमध्ये पहिल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कधीच शमीचं नाव हे प्रामुख्याने घेण्यात आलं नाही. अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याचा कधीच सातत्याने विचार झाल्याचं दिसून येत नाही. 50 ओव्हरच्या क्रिकेटमधील आयसीसीच्या या सर्वोच्च स्पर्धेमध्ये मागील 3 पर्वात भारत 28 सामने खेळला आहे. त्यापैकी केवळ 18 सामने शमी खेळला असून त्यातील 15 भारताने जिंकलेत.

सलग दोन वर्ल्ड कपमध्ये असं झालं की...

2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही त्याला पहिल्या चार समान्यांमध्ये अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नव्हतं. बरं रोहितच्या नेतृत्वाखालील संघातच असं झालेलं असा प्रकार नाही. यापूर्वी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली संघाचं नेतृत्व करत असतानाही असाच प्रकार घडला होता. त्यावेळेस रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. शमीला स्पर्धेमध्ये भारताच्या पाचव्या सामन्यात त्याला अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली आणि त्याने अपेक्षेप्रमाणे संधीचं सोन करत या सामन्यात हॅटट्रीक घेतली. त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली. या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या.

मात्र एवढ्या उत्तम कामगिरीनंतर त्याने साखळी सामन्यांमध्ये तीन सामन्यांत 14 विकेट्स घेतल्यानंतरही त्याला साखळी फेरीतील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्याच्यावेळी संघाबाहेर ठेवण्यात आलं. तर न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी-फायलनमधूनही त्याला वगळण्यात आलं. हा सामना 18 धावांनी पराभूत झाल्याने भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला. 

नक्की वाचा >> 'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं

उत्तम कामगिरी करुनही...

या साऱ्या घटनाक्रमाबद्दल शमीने युट्यूबर शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. 'अनप्लग्ड' या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना शमीने 2019 पासून संघ व्यवस्थापनाची भूमिका आपल्याला गोंधळात टाकणारी असल्याचं शमीने म्हटलं आहे. प्रत्येक संघाला चांगली कामगिरी करणारे खेळाडू हवे असता. मग असं असताना आपण मैदानात सर्वोत्तम कामगिरी करत असानाही आपल्याकडे दूर्लक्ष का केलं जात आहे असा सवाल शमीने उपस्थित केला आहे. "2019 मध्ये (वर्ल्ड कप स्पर्धेत) मी पहिले 4 ते 5 सामने खेळलो नव्हते. माझ्या पहिल्या सामन्यात मी हॅटट्रीक घेतली. पुढच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या पुढल्या सामन्यात मी चार गडी बाद केले. अशीच गोष्ट 2023 ला घडली. मी पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळलो नव्हतो. त्यानंतर मी पाच विकेट्स घेतल्या. नंतर चार विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर पुन्हा पाच विकेट्स घेतल्या," असं शमीने त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> अजिंक्य रहाणेला म्हाडाची तब्बल 10 कोटींची 'लॉटरी'; थेट BCCI चा हस्तक्षेप! 'ती' प्रॉपर्टी चर्चेत

शमीने व्यक्त केला संताप

"मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं ते म्हणजे, प्रत्येक संघाला उत्तम कामगिरी करणारे खेळाडू हवे असतात. मी 3 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच यासंदर्भात प्रश्न विचारले नाहीत आणि माझ्याकडे याची उत्तरंही नाहीत. मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्वत:ला सिद्ध करुन दाखवणं एवढेच माझ्या हातात आहे. तुम्ही मला संधी दिली मी तीन सामन्यात तुम्हाला 13 विकेट्स मिळवून दिल्या. त्यानंतर आपण न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झालो. मी एकूण चार सामने खेळलो ज्यात 14 विकेट्स घेतल्या. 2023 मध्ये मी सात सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या," असं शमीने नमूद केलं. या विधानावरुन शमीने एकप्रकारे 2019 साली भारताचा कर्णधार असलेल्या विराट कोहली आणि तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या धोरणात्मक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> 'वा काय संघ आहे! ODI, टी-20 मधले शतकवीर वगळले, सिलेक्टर्सला कदाचित...'; थरुर संतापले

...म्हणून मिळालं शमीला स्थान

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला म्हणून शमीला संघात स्थान मिळालेलं. त्याचं त्याने सोनं करुन दाखवत भारताला वर्ल्ड कप जिंकण्याच्या अगदी समीप नेलं होतं. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.