मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत. तसंच भारतामध्ये पाकिस्तानविरुद्धचा संताप वाढला आहे. म्हणूनच वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या सगळ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडुल्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयची उद्या म्हणजेच शुक्रवारी बैठक होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशी खेळायचं का नाही, याबद्दल आम्ही परराष्ट्र मंत्रालय, खेळ मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांचं मत विचारात घेऊ. सरकारचं मत विचारात घेतल्यानंतरच याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ, असं डायना एडुल्जी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.


बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीनं आता चेंडू भारत सरकारच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे यावर भारत सरकार काय निर्णय घेतं, हे महत्त्वाचं ठरणार आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीमध्ये आयसीसीची दुबईमध्ये बैठक होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नका, असं भारत सरकारनं सांगितलं तर आयसीसीच्या या बैठकीत हा मुद्दा उचलला जाऊ शकतो.



खेळाडूंच्या प्रतिक्रिया


पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये खेळू नये, अशी भूमिका घेतली आहे. सौरव गांगुली, हरभजन सिंग आणि अजहरुद्दीन यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.


'जर आपण पाकिस्तानशी द्विपक्षीय सीरिज खेळत नसू, तर वर्ल्ड कपमध्येही त्यांच्याविरुद्ध खेळायची गरज नाही. देशापेक्षा वर्ल्ड कप मोठा असू शकत नाही. जर तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध खेळायचं असेल, तर सगळीकडे खेळा. जर खेळायचं नसेल, तर कुठेच खेळू नका', असं अजहरुद्दीन म्हणाला.


वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. पाकिस्तानविरुद्ध खेळलं नाही तरी भारताला वर्ल्ड कप जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही, कारण या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे, असं मत सौरव गांगुली आणि हरभजननं व्यक्त केलं. पण सेमी फायनल आणि फायनलमध्ये जर पाकिस्तानविरुद्धची मॅच असेल, तरी भारतानं आपली न खेळण्याची भूमिका कायम ठेवावी, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीनं दिली. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. तर या स्पर्धेत १६ जूनला भारत-पाकिस्तानचा सामना नियोजित आहे.