Asia Cup 2022: आशिया कप 2022 स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाने आपल्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. सर्वोत्तम खेळाडू संघात असावे यासाठी त्या त्या देशातील निवड समितीने प्रयत्न केले आहेत. या खेळाडूंमुळे स्पर्धा रंगतदार वळणावर येईल, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे. असं असलं तरी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याकडून सर्वाधिक अपेक्षा असणार आहे. तर पाकिस्तानच्या विजयाची मदार बाबर आझमवर असेल. याशिवाय, श्रीलंकेच्या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. बांगलादेशचा संघ कर्णधार शकिब अल हसनवर सर्वाधिक अवलंबून असेल. राशिद खान आणि मोहम्मद नबी अफगाणिस्तानसाठी तारणहार ठरतील.  चला तर जाणून घेऊयात पाच संघ आणि त्या संघातील स्टार खेळाडूंबद्दल...


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    भारत: आशिया कप स्पर्धेतील गट 'अ'मध्ये  भारतीय संघ आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक असे सरस स्टार खेळाडू आहेत. पण सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे या दोन खेळाडूंवर क्रीडाप्रेमींच्या नजरा असणार आहेत. त्याचबरोबर युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. 


भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.


राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर


  • पाकिस्तान: भारतासह पाकिस्तानचा संघ अ गटात आहे.  अ गटातील तिसरा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि युएईमधील कोणताही संघ पात्रता फेरी जिंकल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या गटात प्रवेश करेल. या गटात भारतीय संघ असल्याने पाकिस्तान संघाने कंबर कसली आहे. पाकिस्तान संघाची संपूर्ण जबाबदारी फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमवर असणार आहे. त्याचबरोबर आसिफ अली आणि मोहम्मद रिझवान यांच्याकडे नजर असेल. गोलंदाजीची धुरा शादाब खान आणि नसीम शाहवर असेल. 


पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर


  • अफगाणिस्तान: अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे तीन संघ ब गटात आहेत. अफगाणिस्तानसाठी राशिद खान आणि मोहम्मद नबी हे दोन खेळाडू महत्त्वाचे खेळाडू आहेत. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. तर फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील. दुसरीकडे अंतिम षटकांमध्ये वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी आणि नजीबुल्ला झद्रान हेही सामन्यांना कलाटणी देण्यात पटाईत आहेत.


अफगाणिस्तान संघ: मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला झद्रान, अफसर झझाई, अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झाझई, इब्राहिम झदरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नूर-उल-अहमद, रहमानउल्लाह खान, रहमान खान, इब्राहिम, राशिद खान.


राखीव खेळाडू : निजात मसूद, कैस अहमद, शराफुद्दीन अश्रफ.


  • बांग्लादेश: बांगदेशचा संघ कर्णधार शकिब-उल-हसनवर खूप अवलंबून असेल. अष्टपैलू कामगिरीमुळे संघाच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. दुसरीकडे मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्लाही फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकतात. गोलंदाजीत मुस्तफिझूर रहमान, मेहदी हसन आणि तस्किन अहमद यांच्याकडून अपेक्षा आहेत.


बांग्लादेश संघ: शकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसाद्देक हुसेन, महमुदुल्ला, मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, परवे हुसेन, इमोन, नुरुल हसन सोहन, तस्कीन अहमद.


  • श्रीलंका: श्रीलंकेच्या संघात सामना जिंकण्याची जबाबदारी कर्णधार दासून शनाकावर असेल. त्याच्याशिवाय कुशल मेंडिस आणि भानुका राजपक्षे हे फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकतात. गोलंदाजीत वनिंदू हसरंगा आणि महेश थेक्षाना यांच्यात सामन्याचे चित्र ऐनवेळी बदलण्याची क्षमता आहे.


श्रीलंका संघ: दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजय डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, महेश थिक्षाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रम, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, दुष्मंथा चमीरा, दिनेश चांडीमल