मुंबई : आज आयपीएलचा शेवटचा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना होणार आहे. दोन्ही टीम्सने आतापर्यंत चांगला खेळ केला असून दोन्हींचं पारडं जड दिसून येतेय. अशातच आता सर्वांच्या मनात प्रश्न आहे तो म्हणजे, आजच्या फायनल सामन्यात जर पावसाने अडथळा केला तर कोणती टीम विजयी होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या फायनल सामन्यात पावसासंदर्भात अनेक नियम आहेत. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. मात्र राखीव दिवसापर्यंत पोहोचण्यासाठी देखील काही नियम आहेत.


एका न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, जर पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला तर ओव्हर्समध्ये कपात न करता रात्री 9.20 वाजेपर्यंत सामना सुरु करावा. जर पाऊस सुरु असेल तर 5-5 ओव्हर्सचा सामना खेळवला जाऊ शकतो.


जर सामना रात्री 12.50 पर्यंत सुरु नाही झाला तर अशा परिस्थितीत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. यामध्ये दोन्ही टीम्सना एक-एक ओव्हर खेळवण्यास दिली जाईल. मात्र जर पाऊस थांबला नसेल तर सुपर ओव्हर खेळवणं संभव नाही. अशावेळी राखीव दिवसाचा उपयोग केला जाईल.


दरम्यान राखीव दिवशीही पाऊस असेल तर सर्व नियमांचं पालन केलं जाईल. अखेरीस पॉईंट्स टेबलच्या क्रमवारीत प्रथम असणाऱ्या टीमला विजयी घोषित केलं जाईल.