वनडे सिरीजमधून बाहेर काढण्याचा निर्णय नेमका कोणाचा? Rishabh Pant की टीम मॅनेजमेंट? प्रकरणात नवा ट्विस्ट
भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या त्याच्या खराब फॉर्मशी (Bad Form) झुंजताना दिसतोय. अशातच आता त्याला टीमबाहेर करण्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
BAN vs IND: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या त्याच्या खराब फॉर्मशी (Bad Form) झुंजताना दिसतोय. आशेनुसार खेळ करता न आल्याने पंतवर सातत्याने टीका होताना दिसतायत. दरम्यान बांगलादेश विरूद्धच्या सिरीजमध्येही (BAN vs IND) त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र तो अचानक सिरीजबाहेर झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अशातच आता समोर आलेल्या बातमीनुसार, पंतने स्वतः वनडे सिरीजमधून बाहेर करण्याची मागणी केली होती.
रोहित शर्माकडे (Rohit Sharma) केली होती मागणी
बांगलादेशविरूद्ध पहिली वनडे मॅच खेळण्यापूर्वी टॉसच्या दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं होतं की, ऋषभ पंत (Rishabh Pant) आजच्या सामन्याचा भाग नसणार आहे. त्याच्या जागी के.एल राहुल विकेटकीपिंग करणार आहे.
त्यानंतर काही वेळात बीसीसीआयने निवेदन देत पंत संपूर्ण वनडे सिरीज बाहेर असल्याचं सांगितलं. मात्र यावेळी पंतला टीमबाहेर का करण्यात आलं याचं कारण देण्यात आलं नव्हतं. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, त्याला मेडिकल टीमच्या सांगण्यावरून रिलीज करण्यात आलंय. पंत टीममध्ये नसल्याने के.एल राहुलला विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे.
मात्र आता क्रिकबजच्या एका रिपोर्टनुसार, विकेटकीपर ऋषभ पंतने स्वतः कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांना वनडे सिरीजपासून बाहेर ठेवण्याची मागणी केली होती.
टीममधील इतर खेळाडूंना नव्हती माहिती
ऋषभ पंतला (Rishabh Pant) वनडे सिरीजमधून बाहेर ठेवण्यात आलंय याची माहिती, टीममधील इतर खेळाडूंना नसल्याचं समोर आलं होतं.
भारतीय टीमचा उपकर्णधार केएल राहुल याने सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फर्न्समध्ये सांगितलं की, तो जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला त्यावेळी ऋषभ पंत तिथे नव्हता. त्यानंतर टीम मॅनेजमेंटकडून त्याला विकेटकीपिंग करावी लागणार असल्याचं सांगण्यात आलं.
ऋषभ पंतकडून निराशाजनक कामगिरी
ऋषभ पंतचा गेल्या काही दिवसांपासून खेळही चांगला होताना दिसत नाहीये. ऋषभ पंतला टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये झिम्बाब्वे आणि इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हेनमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र दोन्ही सामन्यांमध्ये त्याला केवळ 9 रन्स करणं शक्य झालं. याशिवाय न्यूझीलंड दौऱ्यावर देखील त्याने चाहत्यांना निराश केलं.