Mumbai Indians : `हार्दिक पांड्या कोणाला घाबरला? राशिदसमोर...`, इरफान पठाण जाम भडकला, म्हणतो...
IPL 2024 GT vs MI : मुंबई इंडियन्सने हातातली मॅच का घालवली? यावर इरफान पठाणने विश्लेषण केलं आहे. त्यावेळी त्याने हार्दिक पांड्याकडून कोणत्या दोन चुका झाल्या? यावर भाष्य केलंय.
Irfan Pathan on Hardik Pandya : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. रोहित शर्माने (Rohit Sharma) कॅप्टन्सीवरून काढल्यानंतर हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्या फेल गेला. हार्दिकच्या कॅप्टन्सीमुळे मुंबईला हातात आलेली मॅच गमवावी लागली. हार्दिकने अखेरच्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलमध्ये 10 धावा केल्या. मात्र, त्याला सामन्याचा निकाल झुकवता आला नाही. प्रत्येक ओव्हरनंतर सामन्याचं चित्र बदलत गेलं अन् अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातने पत्ते फिरवले. मुंबईच्या पराभवानंतर इरफान पठाणने (Irfan Pathan) सामन्याचं विश्लेषण करताना पांड्यावर निशाणा लगावला.
काय म्हणाला इरफान पठाण?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्याने दोन मोठ्या चुका केल्या. पहिली म्हणजे पांड्याने इंनिंगची सुरूवात त्याच्या बॉलिंगने केली. त्याला तिथं मार बसला. हार्दिकने बुमराहला बॉलिंग न देता स्वत:कडे पहिली ओव्हर ठेवली. त्यामुळे मुंबईला झटपट विकेट्स मिळाल्या नाहीत. तर दुसरी चूक म्हणजे पांड्याने टीम डेव्हिडला आधी पाठवलं. टीम डेव्हिडला आधी पाठवण्याचं कारण काय होतं? असा सवाल इरफान पठाणने विचारला आहे. राशीद खानची एक ओव्हर बाकी होती, हार्दिक पांड्या राशीद खानला खेळण्यासाठी घाबरत होता का? असं देखील इरफान पठाणने म्हटलं आहे.
राशीदची एक ओव्हर बाकी असताना टीम डेव्हिला फलंदाजीला पाठवलं. तुमच्याकडे दिग्गज खेळाडू असताना नवख्या खेळाडूला पाठवून मुंबईने चूक केली आणि मला वाटतं इथंच सामना गुजरातच्या पारड्यात गेला. मात्र, दुसरीकडे शुभमन गिलचं देखील कौतूक करायला हवं, शुभमन गिलने ज्याप्रकारे कॅप्टन्सी केली, त्यामुळे तो नक्कीच कौतूकास पात्र आहे, असंही इरफान पठाणने म्हटलं आहे.
दरम्यान, बीसीसीआयची लिलाव यादी जाहीर झाल्यानंतर देखील इरफानने हार्दिक पांड्यावर टीका केली होती. हार्दिक सारख्या खेळाडूला कसोटी क्रिकेट खेळायचे नसेल तर त्याने आणि त्याच्यासारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना वनडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग का घेऊ नये? हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेटला अपेक्षित परिणाम साधता येणार नाहीत, असं इरफान पठाणने म्हटलं होतं.