VIDEO: तुम्ही आमच्या देशात का येत नाही? पाकिस्तानी चाहत्याचा प्रश्न ऐकताच सूर्यकुमार म्हणाला, `आमच्या...`
Surykumar Yadav with Pakistani Fan: टीम इंडियांचे धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना दक्षिण आफ्रिकेत एक पाकिस्तानी क्रिकेट फॅन भेटला
Surykumar Yadav with Pakistani Fan: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी 20 सीरिज सुरु असून या सीरिजमधील दुसरा सामना हा रविवारी पार पडला. या सामन्यात अवघ्या तीन विकेट्सने भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरिज 1-1 अश्या बरोबरीत आली आहे. फावल्या वेळेत टीम इंडियाचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेत फिरत आहेत. दरम्यान टीम इंडियांचे धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना दक्षिण आफ्रिकेत एक पाकिस्तानी क्रिकेट फॅन भेटला. यावेळी त्यांनी सुर्यकुमार यादवला प्रश्न विचारला.
भारत-पाकिस्तान संबंध तणावाचे
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामने पाहणे हे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार होत जातो. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध कटू झाले आहेत. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर शेजारी देशाशी संबंध संपुष्टात आले आहेत. पाकिस्तानकडून वेळोवेळी भारतात कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतो. या सर्व पार्श्वभूमीवर खेळाडू ते क्रिकेटर्स सर्वांवर यामुळे निर्बंध आले. आयपीएलमध्ये पाकिस्तान खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. बीसीसीआयने टीम इंडियाच्या पाकिस्तानी दौऱ्यांवर बंदी घातली.
काय आहे व्हिडीओत?
सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात सुर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग एका मॉलमध्ये दिसतायत. तिथे 2 पाकिस्तान चाहते या दोघांसोबत फोटो काढतायत. आम्ही मॅच बघायला आलो होतो, असे त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडुंना सांगितले. दरम्यान त्यातील एक चाहता सुर्यकुमारला तुम्हाला एक प्रश्न विचारु का? असे विचारतो. सुर्यकुमार त्याला हो म्हणून संमती देतो. तुम्ही पाकिस्तानात का नाही येत आहात? असा प्रश्न चाहत्याने सुर्यकुमारला विचारला. त्यावेळी एक क्षणभर सुर्यकुमारने त्याच्याकडे पाहिले. यानंतर जवळच असलेल्या रिंकू सिंगकडेदेखील सुर्यकुमारने पाहिले. रिंकूच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. दरम्यान सुर्यकुमारने त्या चाहत्याला उत्तर दिले.
सुर्यकुमार यादवने दिले उत्तर
'आमच्या हातात थोडीच असतं ते?' असं उत्तर त्याने चाहत्याला दिलं. यानंतर हा व्हिडीओ बंद होतो. चाहत्याला त्याच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळालेले असते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामस, फेसबुक, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होतोय. क्रिकेट चाहते त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
'सेफ्टी हे कारण असू शकत नाही...'
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज रशीद लतीफ यांनी मोठं वक्तव्य केलं असून जर भारताने पाकिस्तानला येण्यास नकार दिल्यास पाकिस्तान आयसीसीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकेल, असे सांगत भारताला धमकी दिली आहे. रशीदच्या म्हणण्यानुसार, भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार देऊ शकत नाही, कारण ही आयसीसीची स्पर्धा आहे आणि भारताने त्यासाठी करार केला आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटर रशीद लतीफ एका पाकिस्तानी न्यूज शो दरम्यान म्हणाले की, "ही आयसीसी इव्हेंट आहे. 2024-2031 च्या सायकल वर त्यांची स्वाक्षरी झाली आहे. सर्व प्रसारक आणि प्रायोजकांनी चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी साइन अप केले आहे. कोणतेही ठोस कारण न देता कोणताही संघ स्पर्धेत येण्यास नकार देऊ शकत नाही." रशीद पुढे म्हणाले की, "आयसीसीचे अस्तित्व केवळ पाकिस्तान आणि भारतासाठी आहे. आम्हीही खेळणार नाही असे पाकिस्तान सरकार म्हणाले तर आयसीसीचा काही अर्थ नाही कारण सामना कोणी पाहणार नाही. आपण असे म्हणू शकतो की भारत द्विपक्षीय सामने खेळू इच्छित नाही, परंतु आपण आयसीसी कार्यक्रमास नकार देऊ शकत नाही. कारण त्यांनी त्यावर आधीच स्वाक्षरी केली आहे. जर भारत आला नाही तर पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी न होऊन मोठे पाऊल उचलेल." रशीद लतीफ म्हणाले, "एखाद्या संघाने भाग घेण्यास नकार दिला, तर त्याला त्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी ठोस कारणे द्यावी लागतील. जसे 1996 मध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंकेला गेले नाहीत, तरीही अंतिम फेरीत पोहोचले. सुरक्षेचे कारण दिले तर ते ठोस कारण नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारखे संघ पाकिस्तानात येत आहेत."