Ajinkya Rahane! ज्या सीरीजमध्ये बनला कर्णधार त्याच सीरीजमध्ये उचलावे लागले ड्रिंक्स
अजिंक्य रहाणेचा काळ सध्या खूप वाईट आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीममध्ये सध्या बदलाचा काळ सुरू आहे. अलीकडेच विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आलं आहे. याशिवाय कसोटी संघात अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितला उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं. रहाणे सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममधून जातोय. इतकंच नाही आता रहाणेला त्याची जागा वाचवणं कठीण आहे.
रहाणे खराब फॉर्ममध्ये
अजिंक्य रहाणेचा काळ सध्या खूप वाईट आहे. नुकतंच न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रहाणेला कर्णधारपद देण्यात आलं. ही कसोटी अनिर्णीत झाली आणि इथेच रहाणेला वेळेचा फटका बसला. या सामन्यात कर्णधार बनवलेल्या या खेळाडूला पुढील सामन्यातच वगळण्यात आलं. या प्रकरणावर प्रश्न उपस्थित झाले.
दुखापतीचं कारण देत केलं बाहेर
रहाणेला दुखापतीचं कारण सांगून न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर करण्यात आलं. रहाणेला दुखापत झाल्याची बातमी आली त्यामुळे त्याला बळजबरीने वगळण्यात आलं होतं. मात्र या सामन्यात रहाणे खेळाडूंसाठी पाणी आणि ड्रिंक्स घेऊन जाताना दिसला.
मात्र रहाणेला मैदानावर पाहून अनेकांना प्रश्न पडला की, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीत खेळाडू इतक्या आरामात कसे चालतो. त्याचवेळी रहाणेही नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला.
उपकर्णधारपदंही हिरावलं
हे इथेच संपलं नाही तर रहाणेला कसोटीच्या उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्याच्या जागी रोहित उपकर्णधार असेल. काही काळापासून रहाणेची कामगिरी खूपच खराब आहे आणि त्याला संघातून वगळण्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. कदाचित सिलेक्टर्सकडून त्याला खेळाडू म्हणून शेवटची संधी असेल.