नवी दिल्ली : २००० साली मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं. मॅच फिक्सिंगमध्ये भारतीय क्रिकेटपटूंची नावं समोर आल्यामुळे भारतीय क्रिकेटलाही काळीमा फासला गेला होता. मॅच फिक्सिंग प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या बुकी संजीव चावलाचं ब्रिटनमधून प्रत्यार्पण करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधून भारतात आल्यानंतर संजीव चावला याला १४ दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली, पण कोर्टाने संजीव चावला याला १२ दिवसांची पोलीस कोठडी दिली.


संजीव चावला हा २००० सालच्या मॅच फिक्सिंग प्रकरणाचा प्रमुख आरोपी आहे. संजीव चावलाला भारतात आणण्यासाठी डीसीपी राम गोपाल नाईक यांची टीम इंग्लंडला गेली होती. दिल्ली क्राईम ब्रांचची टीम संजीव चावलाची चौकशी करत आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणात अनेक क्रिकेटपटूंची नाव आली होती. आता संजीव चावलाच्या चौकशीमध्येही काही क्रिकेटपटूंची नावं समोर यायची शक्यता आहे.


दिल्ली पोलिसांनी २००० साली भारत-दक्षिण आफ्रिका मॅच फिक्सिंग प्रकरणी दक्षिण आफ्रिकेचा तेव्हाचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि अन्य ५ खेळाडूंविरोधात चार्जशीट दाखल केली होती. पुराव्याअभावी हर्षल गिब्ज आणि निकी बोए यांची नावं चार्जशीटमधून काढून टाकण्यात आली होती. तर हॅन्सी क्रोनिएने आपण निष्पाप नसल्याचं दक्षिण आफ्रिका बोर्डाचे तेव्हाचे अध्यक्ष अली बाकर यांना रात्री ३ वाजता फोन करुन सांगितलं. किंग कमीशनने मॅच फिक्सिंगच्या या प्रकरणाची चौकशी केली. यानंतर हॅन्सी क्रोनिएवर आयुष्यभर क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली. विमान अपघातामध्ये हॅन्सी क्रोनिएचं निधन झालं.