IPL Final: धोनी पुन्हा यलो जर्सीमध्ये दिसणार का? निवृत्तीवर धोनी म्हणतो...
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली आहे.
दुबई : एमएस धोनीने काल 'यलो आर्मी'च्या फॅन्सना एक मोठी गिफ्ट दिलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली आहे. पण आता सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे की, धोनी पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार का? आणि धोनी निवृत्ती जाहीर करणार का?
आयपीएल जिंकल्यानंतर धोनी नेमकं काय म्हणाला?
आयपीएल 2021च्या अंतिम फेरीनंतर एमएस धोनीने कोलकाता नाईट रायडर्सच्या दुसऱ्या टप्प्यातील कामगिरीचे कौतुक केलं. आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, "त्याने यंदाच्या अनेक खेळाडूंचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला. फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि योग्य योगदान दिलं."
निवृत्तीबाबत धोनी म्हणाला...
सामना संपल्यानंतर हर्षा भोगले यांनी धोनी निवृत्तीसंदर्भात प्रश्न विचारला. पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याबाबत धोनी म्हणाला, "बीसीसीआयवर बरंच काही अवलंबून आगहे. कारण 2 नवीन संघ येत आहेत आणि मला माझ्या फ्रेंचायझीला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ द्यायचं नाही."
पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळणार?
'मी सीएसकेसाठी खेळणार की नाही हे महत्त्वाचं नाही. चेन्नईसाठी काय सर्वोत्तम असेल हे महत्त्वाचे आहे. कोअर ग्रुपने 10 वर्षांपासून संघ सांभाळला आहे. आता आम्हाला सर्वोत्तम काय आहे ते पाहावं लागणार आहे. तसंही मी अजून काही सोडलं नाहीये, असं म्हणत धोनी स्वतःच्या खास अंदाजात हसला. धोनीच्या या विधानावरून, हे स्पष्ट झालं नाहीये की त्याची पुढील पायरी काय असेल?