वेलिंग्टन : क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना शारिरिक ताण येत आहे, पण कमीतकमी पुढची ३ वर्ष क्रिकेटचे सगळे फॉरमॅट खेळणार आहे, असं विराट कोहली म्हणाला आहे. मी भविष्यातलं मोठं चित्र बघत आहे. पुढच्या ३ वर्षांमध्ये २ टी-२० वर्ल्ड कप आणि ५० ओव्हरला वर्ल्ड कप होणार आहे. यानंतर तीनपैकी २ फॉरमॅटमध्येच खेळण्याबाबत विचार करेन, असं विराटने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२१ सालचा टी-२० वर्ल्ड कप भारतामध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपनंतर एखाद्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार का? असा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता.


'याबाबत बोलणं तुम्ही टाळू शकत नाही. मागच्या ८ वर्षांपासून मी वर्षाचे जवळपास ३०० दिवस क्रिकेट खेळत आहे. यामध्ये प्रवास आणि सरावाचाही समावेश आहे. प्रत्येकवेळी त्याच उर्जेने खेळावं लागतं, त्यामुळे ताण येतो. कर्णधार असताना या गोष्टी सोप्या नाहीत.' अशी कबुली विराटने दिली आहे.


विराट कोहली यावर्षी ३१ वर्षांचा होणार आहे. काही सीरिजमध्ये विश्रांती घेतल्यामुळे फायदा होतो. ३४ किंवा ३५व्या वर्षी शरीर कदाचित साथ देणार नाही, त्यावेळी आपल्यामध्ये वेगळा संवाद होईल, असं विराट म्हणाला.


२०२३ वर्ल्ड कपपर्यंत मला याच उर्जेने खेळायचं आहे. यानंतर बदल व्हायला सुरुवात होईल. अशाच प्रकारे पाच-सहा वर्षांपूर्वी सचिन, द्रविड आणि लक्ष्मण निवृत्त होताना भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहिले होते, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.