भारतीय महिला क्रिकेट संघाकडे टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी
भारतीय संघाकडे पराभवाचा बदला घेण्याची संधी
मुंबई : महिला टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला उद्या इंग्लंडचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे. २०१७ महिला विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न इंग्लंडच्या संघानं धुळीस मिळवलं होतं. त्यामुळे आता या पराभवाची सव्याज परतफेड करण्याच्या उद्देशानचं भारतीय महिला संघ मैदानात उतरेल.
२०१७ महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय महिला संघाचं जगज्जेते होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं. आता हा संघ महिला टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज आहे. मात्र, पुन्हा एकदा भारतीय महिला संघसमोर हा इंग्लंडच्या संघाचाच अडथळा आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लिश संघाला परास्त करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
भारतीय संघाची मदार ही मिताली राज, कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मनधाना आणि जेमिमा रॉड्रीगेजवर असेल. तर अनुजा पाटील, राधा यादव, दयालान हेमलथा, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी आपल्या फिरकीची छाप सोडण्यात यश मिळवलंय.
भारतीय महिला संघाला या फिरकी गोलंदांजांकडून मोठ्या अपेक्षा असतील. भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या संघाचा आत्मविश्वास निश्चितच दुणावलेला असेल. तर इंग्लिश संघाला कॅरेबियन संघाकडून अखेरच्य़ा साखळी सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
दोन्ही संघ तुल्यबळ असलेल्या क्रिकेटप्रेमींसाठी ही लढत एक पर्वणीच ठरणार आहे. आता भारतीय संघ इंग्लंडला पराभवाचा धक्का देत टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश करणार का याकडेच तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.