नागपूर : भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ही सीरिज २-१नं जिंकली आहे. या मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि ९ विकेट गमावून २०१ रन्स केल्या. भारतानं ४५.२ ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडची विकेट कीपर एमी जोन्सनं ९४ रन्सची खेळी केली. जोन्सशिवाय कॅप्टन हीथर नाईटनं ३६ रन्सचं योगदान दिलं. भारताच्या दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.


मिताली राजचा विश्वविक्रम


या मॅचमध्ये मिताली राजनं विश्वविक्रम केला आहे. सर्वाधिक वनडे खेळणारी मिताली ही जगातली पहिली महिला खेळाडू बनली आहे. या मॅचमध्ये मितालीनं ५०वं अर्धशतक झळकावलं. महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत एवढी अर्धशतकं कोणत्याही खेळाडूनं केलेली नाहीत.


एवढ्या वनडे खेळणारी एकमेव खेळाडू


मिताली राजनं आत्तापर्यंत १९४ वनडे मॅच खेळल्या आहेत. एवढ्या वनडे खेळणारी मिताली एकमेव महिला खेळाडू आहे. ३५ वर्षांच्या मितालीनं पहिली वनडे २६ जून १९९९ला खेळली होती. एवढ्या मॅचमध्ये मितालीनं ६,२९५ रन्स केल्या आहेत. यामध्ये ६ शतक आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. याचबरोबर मितालीनं १० टेस्ट मॅच आणि ७२ टी-20 मॅचही खेळल्या आहेत. याआधी चारलोट एडवर्ड्सच्या नावावर सर्वाधिक वनडे खेळण्याचं रेकॉर्ड होतं.