नवी दिल्ली : भारताची विश्व चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं आशियाई खेळांतून माघार घेतलीय. पाठदुखीनं त्रस्त असलेल्या मीराबाईनं इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशनला पत्र लिहून आराम देण्यासाठी विनंती केली होती. ऑलिम्पिक क्वालिफायरसाठी तिला स्वत:ला तयार करायचंय असल्याचंही तिनं म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन (आयडब्ल्यूएलएफ) चे सचिव सहदेव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय. 



आशियाई खेळांचं आयोजन १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेम्बँग शहरात करण्यात आलंय. भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू या खेळांत सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार होती.


जकार्तामध्ये होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेऊन येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक क्वालिफायरवर लक्ष देण्याचा सल्ला भारताचे मुख्य कोच विजय शर्मा यांनी मीराबाई चानू हिला दिला होता. मीराबाई गेल्या मे महिन्यापासून पाठदुखीच्या समस्येशी झगडतेय. गेल्या आठवड्यात आराम वाटल्यानंतर तिनं मुंबईत पुन्हा सराव सुरू केला होता... परंतु, पुन्हा एकदा पाठदुखीचा त्रास सुरू झाला. 


मूळची मणिपूरच्या असलेल्या या २३ वर्षीय खेळाडूनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वर्गात १९४ किलो वजन उचलून सुवर्ण पदक आपल्या नावावर नोंदवलं होतं. तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्येही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत १९६ किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं होतं. हा एक राष्ट्रीय रेकॉर्डदेखील आहे.