`२०११ क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल फिक्स`, धक्कादायक आरोप
२०११ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.
मुंबई : २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या फायनलमध्ये गंभीर आणि धोनीच्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेचा पराभव केला. पण आता ९ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर हा सामना फिक्स असल्याचा आरोप श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंदा अलूथगमागे यांनी केला आहे. २०११ वर्ल्ड कपदरम्यान अलूथगमागे श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते.
अलूथगमागे यांनी हे आरोप केले असले तरी त्यांनी याबाबतचे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. '२०११ सालची वर्ल्ड कप फायनल मॅच फिक्स होती. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी क्रीडा मंत्री असतानाच हे झालं होतं,' असं महिंदानंदा अलूथगमागे यांनी श्रीलंकेतील वृत्तवाहिनी न्यूज फर्स्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
'हे मी जबाबदारीने बोलत आहे. पण देशासाठी मी नावांची घोषणा करणार नाही. पण यासाठीच्या चर्चेसाठी मी पुढे येऊ शकतो. मी यामध्ये क्रिकेटपटूंना ओढणार नाही, पण काही समूह मॅच फिक्स करण्यामध्ये सहभागी होते,'असं वक्तव्य त्यांनी केलं.
माजी क्रीडा मंत्र्यांच्या या वक्तव्याचा कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेने समाचार घेतला आहे. 'निवडणुका जवळ आल्या आहे का? सर्कस सुरू झाली आहे. नावं आणि पुरावे कुठे आहेत?' असा प्रश्न महेला जयवर्धनेने विचारला आहे. तर दुसरीकडे 'याबाबतचे पुरावे आयसीसीकडे आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे घेऊन जावे, त्यामुळे आरोपांची सखोल चौकशी होईल', अशी मागणी संगकाराने केली आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या मॅचमध्ये श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धनेने शतक करून श्रीलंकेचा स्कोअर २७४/६ पर्यंत पोहोचवला होता. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सचिन, सेहवाग आणि विराट कोहलीच्या विकेट ३१ रनवरच गमावल्या होत्या.
सुरुवातीच्या धक्क्यानंतर गौतम गंभीर आणि धोनीने १०९ रनची पार्टनरशीप करून भारताला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकवून दिला.