World Cup 2019 : आई घाबरेल म्हणून बाऊन्सर लागल्यावरही लगेच उठला क्रिकेटपटू
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा बॅट्समन हशमतुल्लाह शाहिदीच्या हेल्मेटला बॉल लागला.
मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा बॅट्समन हशमतुल्लाह शाहिदीच्या हेल्मेटला बॉल लागला. हेल्मेटला बॉल लागल्यानंतर हशमतुल्लाह मैदानातच पडला, पण आई घाबरेल म्हणून तो लगेच उभा राहिला. शाहिदी २४ रनवर बॅटिंग करत असताना इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वूडने टाकलेला ९० माईल प्रती तासाचा बॉल हेल्मेटवर आदळला. बॉल डोक्याला लागल्यानंतर हशमतुल्लाह रिटायर्ड हर्ट होईल, असं वाटत होतं, पण त्याने हेल्मेट बदललं आणि बॅटिंग सुरु ठेवली.
हशमतुल्लाहने ७६ रनची खेळी केल्यानंतरही या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा १५० रननी पराभव झाला. या मॅचमध्ये हशमतुल्लाह अफगाणिस्तानचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.
'आईला त्रास होऊ नये म्हणून बॉल लागल्यानंतरही मी लगेच उभा राहिलो. मागच्याच वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं, यामुळे माझ्या आईला मी दु:खी बघू शकत नाही. माझं संपूर्ण कुटुंब ही मॅच बघत होतं. माझा मोठा भाऊ मैदानात होता. माझं कुटुंब चिंतित होऊ नये म्हणून मी मला लागल्याचं दाखवलं नाही,' अशी प्रतिक्रिया हशमतुल्लाहने दिली.
डोक्याला बॉल लागल्यानंतर डॉक्टरांनी हशमतुल्लाहला मैदानाबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. पण तरीही हशमतुल्लाहने बॅटिंग सुरु ठेवली. 'आयसीसीचे डॉक्टर आणि आमच्या टीमचे फिजिओ माझ्याजवळ आले. माझं हेल्मेट मधून तुटलं होतं. त्यांनी मला मैदानातून बाहेर यायला सांगितलं, पण मी टीमला अर्ध्यात सोडून जाऊ शकत नव्हतो. टीमला माझी गरज असल्यामुळे बॅटिंग सुरु ठेवली. मॅच संपल्यानंतर मी आयसीसीच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं आणि सगळं व्यवस्थित होईल, असं सांगितलं,' असं हशमतुल्लाह म्हणाला.
इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यामधली ही मॅच बघायला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनीही ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात आले होते.