World Cup 2019 : इंग्लंडला पराभवाचा आणखी एक धक्का, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये
वर्ल्ड कपमध्ये यजमान इंग्लंडच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे
लंडन : वर्ल्ड कपमध्ये यजमान इंग्लंडच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडचा ६४ रननी पराभव झाला आहे. याचबरोबर यंदाच्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारी ऑस्ट्रेलिया ही पहिली टीम बनली आहे. तर सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आता इंग्लंडला उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. इंग्लंडच्या उरलेल्या मॅच या भारत आणि न्यूझीलंड या तगड्या टीमशी होणार आहेत. या दोन्ही टीमनी यंदाच्या वर्ल्ड कपमधली एकही मॅच गमावलेली नाही.
ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २८६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा ४४.४ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर जेसन बेहरनडॉर्फने इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. बेहरनडॉर्फची वनडे कारकिर्दीतली ही सर्वोत्तम कामगिरी होती. वनडे क्रिकेटमध्ये बेहरनडॉर्फला पहिल्यांदाच ५ विकेट मिळाल्या. तर मिचेल स्टार्कला ४ आणि मार्कस स्टॉयनिसला १ विकेट मिळाली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ८९ रनची खेळी केली.
या मॅचमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिले बॅटिंगला बोलावलं. ऑस्ट्रेलियाला निर्धारित ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २८५ रन करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन एरॉन फिंचने १०० आणि वॉर्नरने ५३ रन केल्या.
ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी एरॉ़न फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२३ रन जोडल्या. या सेट जोडीला तोडण्यास मोईन अलीला यश आले. त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला ५३ रनवर आऊट केले. वॉर्नर आऊट झाल्यानंतर उस्मान ख्वाजा मैदानात आला. एरॉन फिंच आणि ख्वाजा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० रन जोडल्या. ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का १७३ स्कोअर असताना लागला. उस्मान ख्वाजा २३ रन करुन माघारी परतला.
यानंतर ऑस्ट्रेलियाने ठराविक टप्प्याने विकेट टाकल्या. ख्वाजानंतर एकाही खेळाडूला जास्त वेळ मैदानात टिकता आले नाही. सलामीवीरांचा अपवाद वगळता, स्टीव्ह स्मिथ आणि एलेक्स कॅरी या दोघांनी ३८ रन केल्या.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्च्रर, मार्क वूड, बेन्स स्टोक्सने आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या खेळीला खिळ घातली.