नॉटिंगहम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा १५ रननी पराभव झाला आहे. ५० ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला २७३/९ इथपर्यंतच मजल मारता आली. यंदाच्या वर्ल्ड कपमधला ऑस्ट्रेलियाचा हा २ मॅचमधला दुसरा विजय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २८९ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला स्कोअरबोर्डवर ७ रन असतानाच एव्हिन लुईसच्या रुपात पहिला धक्का बसला. यानंतर स्कोअर ३१ रन असताना क्रिस गेल आऊट झाला. सुरुवातीच्या दोन विकेट गेल्यानंतर शाय होप आणि निकोलास पूरन यांनी वेस्ट इंडिजच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. पण पूरन ४० रनवर माघारी परतला.


वेस्ट इंडिजला वारंवार झटके लागत असतानाच शाय होप एक बाजू लढवत होता, पण तोदेखील ६८ रनवर आऊट झाला. शाय होप पॅव्हेलियनमध्ये गेला तरी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरची झुंज सुरूच होती. होल्डरने ५७ बॉलमध्ये ५१ रन केले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्सला २ आणि ऍडम झम्पाला १ विकेट मिळाली.


त्याआधी नॅथन कुल्टर नाईलची फटकेबाजी आणि स्टिव्ह स्मिथच्या संयमी खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं विंडिजपुढे सन्मानजनक स्कोअर उभारला. ऑस्ट्रेलियाचा ४९ ओव्हरमध्ये २८८ रनवर ऑल आऊट झाला. वर्ल्ड कपच्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या बॉलरनी हा निर्णय योग्य ठरवला आणि सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑस्ट्रेलियाची अवस्था एकावेळी ३८/४ आणि ७९/५ अशी होती, पण स्टिव्ह स्मिथ एका बाजूने किल्ला लढवत होता.


स्मिथने एलेक्स कारे आणि नॅथन कुल्टर नाईलसोबत महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नॅथन कुल्टर नाईलने ६० बॉलमध्ये ९२ रन केले. यामध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. स्टिव्हन स्मिथने १०३ बॉलमध्ये संयमी ७३ रन केले. तर एलेक्स कारे ४५ रन करून आऊट झाला.


वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रॅथवेटने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर ओशेन थॉमस, शेल्डन कॉट्रेल आणि आंद्रे रसेलला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. जेसन होल्डरला एक विकेट घेण्यात यश आलं.


p>