नवी दिल्ली : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जाईल. ऑस्ट्रेलियाबरोबर भारत किंवा इंग्लंड फायनल खेळेल, असा अंदाज गंभीरने वर्तवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंग्लंड फक्त त्यांच्या घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे दुसरी प्रबळ दावेदार नाही, तर त्यांच्याकडे प्रत्येक क्रमांकासाठी खेळाडू आहेत. इंग्लंडची टीम संतुलित आहे. जोफ्रा आर्चर इंग्लंडसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. इंग्लंडकडे बेन स्टोक्स आणि मोईन अली यांच्यासारखे ऑलराऊंडर आहेत,' असं वक्तव्य गंभीरने केलं.


टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गंभीर म्हणाला, 'रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर भारताच्या बॅटिंगची जबाबदारी असेल. तर बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह एक्स-फॅक्टर असेल,' असं गंभीर म्हणाला.


'आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे, पण ५० ओव्हरचं क्रिकेट वेगळं आहे. वेस्ट इंडिजकडे चांगले स्पिनर नाहीत. फक्त फास्ट बॉलर तुम्हाला वर्ल्ड कप जिंकवू शकत नाही,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.


२०११ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शतक न करण्याचं दु:ख आहे का? असा सवाल गंभीरला विचारण्यात आला. तेव्हा फायनलमध्ये शतक न करण्याचं मला अजिबात दु:ख नाही. आमचा उद्देश फक्त वर्ल्ड कप जिंकणं हाच होता. मला मोठं योगदान द्यायचं होतं, ते मी दिलं. छोट्या स्कोअरऐवजी ९७ रन चांगले असतात. मला ३ रन न करण्याचं अजिबात दु:ख नाही, असं गंभीरने सांगितलं. २०११ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गंभीरने ९७ रनची खेळी केली होती.