टॉनटन : वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या ३२२ रनचा पाठलाग करताना बांगलादेशचा ७ विकेटने विजय झाला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासातला हा दुसरा सगळ्यात मोठा आव्हानाचा यशस्वी पाठलाग आहे. शाकिब अल हसन हा बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शाकिबने ९९ बॉलमध्ये नाबाद १२४ रन केले. शाकिबने त्याच्या या खेळीमध्ये १६ फोर लगावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. तमिम इक्बाल आणि सौम्य सरकार यांच्यामध्ये ५२ रनची पार्टनरशीप झाली. सौम्य सरकार २९ रनवर आऊट झाला, यानंतर तमिम इक्बाल ४८ रन करून माघारी परतला. तमीम इक्बालची विकेट गेल्यानंतर बांगलादेशला लगेचच मुशफिकुर रहिमच्या रुपात तिसरा धक्का लागला. मुशफिकुर फक्त १ रन करुन आऊट झाला. यानंतर मात्र शाकिब अल हसन आणि लिटन दास यांनी वेस्ट इंडिच्या बॉलरना विकेट दिली नाही. लिटन दासने ६९ बॉलमध्ये ९४ रन केले. यामध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या बॉलरनी हा निर्णय योग्य ठरवला. १३ बॉलमध्ये शून्य रन करून क्रिस गेल आऊट झाला. यानंतर एव्हिन लुईस आणि शाय होप यांनी ११६ रनची पार्टनरशीप केली. लुईस ७६ रनवर आणि होप ९६ रनवर आऊट झाला. शिमरन हेटमायरने २६ बॉलमध्ये ५० रनची धडाकेबाज खेळी केली. तर कर्णधार जेसन होल्डरने शेवटच्या काही ओव्हरमध्ये आक्रमक खेळ केला. होल्डरने १५ बॉलमध्ये ३३ रन केले.


बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्तफिजूर रहमानला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर बॅटिंगमध्ये शतकी खेळी करणाऱ्या शाकिब अल हसनने बॉलिंग करताना २ विकेट घेतल्या.