मँचेस्टर : बुधवारी मँचेस्टर येथे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना खेळवला गेला. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना तब्बल दोन दिवस चालला. पण, अखेर किवींच्या संघाने दिलेलं २४० धावांचं आव्हान मात्र विराटसेनेला पेलता आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकामागोमाग एक भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर माघार घेण्यास सुरुवात केली. यामध्ये रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी मात्र फलंदाजी करत संघाचं अस्तित्व सामन्यात कायम ठेवलं होतं. परिणामी सामन्यात पराभव होऊनही या भारतीय खेळाडूंची सर्व स्तरांतून प्रशंसा झाली. जडेजाला बिट्स अॅण्ड पिसेस खेळाडू म्हणणाऱ्या माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही त्याच्या मैदानावरील फटकेबाजीमुळे शरणागती पत्करली आहे. 


'आज त्याने मला सर्वच बाबतीत चुकीचं ठरवलं आहे.....', असं म्हणत मांजरेकरांनी अखेर उपांत्या फेरीतील जडेजाच्या खेळाची प्रशंसा केली. आपल्या वक्तव्यावर शरणागती पत्करणाऱ्या मांजरेकर यांनी, 'असा जडेजा आपल्याला नेहमी दिसत नाही. पण आज (न्यूझीलंडविरोधातील सामन्यात) मात्र तो अतिशय चातुर्याने आणि प्रत्येक चेंडूचा योग्य अंदाज बांधत खेळला' अशी प्रतिक्रिया दिली. 


मांजरेकर यांच्या या वक्तव्यानंतर क्रीडा विश्वात अनेकांनीच निराशाजनक प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर, खुद्द जडेजानेही ट्विटरच्या माध्यमातून मांजरेकर यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. सध्याच्या घडीला आयसीसीच्या ट्विट अकाऊंटवरुन मांजरेकर यांनी शरणागती पत्करण्याचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 



दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली यानेही या प्रकरणावर त्याचं मौन सोडल्याचं पाहायला मिळालं. उपांत्य फेरीतील जडेजाच्या खेळीचीही विराटने प्रशंसा केली होती.