World Cup 2019 : दक्षिण आफ्रिका यंदा तरी चोकर्सचा शिक्का पुसणार?
क्रिकेट विश्वचषक आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
लंडन : क्रिकेट विश्वचषक आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या म्हणजेच गुरुवारपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रबळ दावेदार मानलं जात नाहीये. त्याची कारणंही तशीच आहेत. कागदावर भक्कम वाटणारा हा संघ विश्वचषकासारख्या स्पर्धेत निर्णायक क्षणी कच खातो. कधी प्रतिस्पर्धी संघातील एखाद्या खेळाडूच्या कामगिरीमुळे तर कधी हवामानामुळे त्यांच्या पदरी पराभव पडलाय हे इतिहास सांगतो.
विश्वचषकात महत्त्वाच्या सामन्यांमध्ये हातातोंडाशी आलेला विजयाचा घास त्यांच्याकडून हिरावला गेलाय. याचमुळे चोकर्स हा शिक्का या संघावर बसला आहे. १९९१मध्ये वर्णद्वेषाच्या धोरणावरुन दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय बंदी होती. यामुळे सुरुवातीच्या चार विश्वचषकांना हा संघ मुकला होता. आंतरराष्ट्रीय बंदी उठवल्यानंतर लगेचचं १९९२ विश्वचषकात दक्षिण आफ्रिका प्रथमच सहभाग झाला. आपल्या पहिल्याच विश्वचषकात प्रोटीयाजनं थेट उपांत्य फेरी गाठली होती.
दक्षिण आफ्रिकेनं चारवेळा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. १९९२, १९९९, २००७ आणि २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकनं उपांत्य फेरी गाठली. मात्र दक्षिण आफ्रिकेला अद्यापर्यंत एकदाही विजेतेपद किंवा उपविजेतेपद पटकावता आलेलं नाही. ए.बी.डिविलियर्सनं अचानक घेतलेल्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकात काय होणार अशी एक चिंता व्यक्त केली जात होती. याखेरीज मॉर्ने मार्केलनंही निवृत्ती जाहीर केलीय. यामुळे या दोन दिग्गजांशिवायचं प्रोटीयाजना विश्वचषकाच्या मैदानात उतरावं लागणार आहे. मात्र त्यांच्या ताफ्यात स्फोटक फलंदाजी करणारे फलंदाज आणि दर्जेदार गोलंदाजही आहेत.
क्विंटन डी कॉक, एडेन माक्रम यांच्यावर दक्षिण आफ्रिकेला मजबूत सलामी देण्याच जबाबदारी असेल. तर हाशिम अमला, फॅफ ड्यू प्लेसिस, जे.पी. डयुमिनी, डेव्हिड मिलर हे मधल्या फळीत फलंदाजीला येतील. इम्रान ताहिरसारखा भरवशाचा फिरकीपटू त्यांच्या ताफ्यात आहे.
प्रोटीयाजचं खरं अस्त्र असेलेल्या वेगवान माऱ्याची जबाबदारी ही रबाडा, डेल स्टेन आणि लुंगी एन्गिडीवर असेल. मात्र रबाडा आणि डेल स्टेन हे त्यांचे दोन महत्त्वाचे योद्धे दुखापतग्रस्त आहेत. यामुळे या दोघांच्या तंदुरुस्तीवरही या संघाचं भवितव्य अवलंबून असेल.
या विश्वचषकात शानदार कामगिरी करत आणि प्रत्येक अडथळ्याला चकवत आपल्यावरील चोकर्स हा शिक्का पुसण्यासाठी दक्षिण आफ्रिकन संघ आतूर असेल.