लंडन : १९९६ सालच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेची टीम बलाढ्य आणि जगज्जेती म्हणून समोर आली. पण या टीमची सध्याची अवस्था पाहिली तर त्यांचा समावेश यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रबळ दावेदारांमध्ये केला जात नाही. 'द लायन्स' नावानं ओळखली जाणारी ही टीम ९०च्या दशकात अंडरडॉग म्हणून ओळखली जायची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९२ पर्यंतच्या वर्ल्ड कपपर्यंत त्यांचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात यायचं. मात्र या अंडरडॉग संघानं १९९६ पर्यंत अशी काही प्रगती केली की थेट वर्ल्ड कपलाच गवसणी घातली. त्यानंतर श्रीलंकन टीमला क्रिकेटविश्वात एक प्रतिष्ठा लाभली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लंकेकडे प्रतिस्पर्धी म्हणून गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं.


श्रीलंकेनं १९९६मध्ये पाकिस्तानला धुळ चारत प्रथमच वर्ल्ड कपवर नाव कोरलं. तर त्यानंतर २००७ आणि २०११ विश्वचषकात ते उपविजेते ठरले.


गेल्या वेळच्या २०१५ वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेनं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. सध्याची श्रीलंकन टीमची कामगिरी पाहता ते वर्ल्ड कप पटकावतील असं काही वाटतं नाही. श्रीलंकन क्रिकेट सध्या अनेक बाबींनी ग्रस्त आहे. क्रिकेट प्रशासन, प्रशिक्षक, ज्येष्ठ खेळाडू या साऱ्यांमधील परस्पर वाद, टीममध्ये गेल्या दोन वर्षांपासून घाऊक प्रमाणात करण्यात आलेले बदल आणि तंदुरुस्ती या मोठ्या आणि गंभीर समस्येनं श्रीलंकेची टीम सध्या ग्रस्त आहे. यामुळे वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत खेळताना या बाबींची परिणाम त्यांच्या कामगिरीवर नक्कीच होईल.


दिमूथ करुणारत्ने आणि अविष्का फर्नांडो यांच्यावर लंकेला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असेल. लाहिरु थिरुमन्ने, एँजलो मॅथ्यूज, कुसाल परेरा, कुसाल मेंडिस, धनंजय डिसिल्वा यांच्यावर श्रीलंकेच्या बॅटिंगची भिस्त असेल.


थिसारा परेरासारखा अष्टपैलू त्यांच्या तंबूत आहे. लंकेच्या ताफ्यात मलिंगासारखा दर्जेदार वेगवान बॉलर आहे, तर त्याच्या जोडीला सुरंगा लकमल आणि नुवान प्रदीप हे वेगावान मारा सांभाळतील. तर जेफ्री वँडरसे, धनंजय डिसिल्वा आणि मिलिंडा सिरिवर्दना यांच्यावूर फिरकीची मदार असेल.


मलिंगाची जादू चालली नाही आणि मॅथ्यूजच्या तंदुरुस्तीची समस्या उदभवली तर या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेला विजयासाठी चांगलाच संघर्ष करण्याची वेळ येऊ शकते. अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या श्रीलंकनं टीमने सारं काही बाजूला ठेऊन केवळ आपल्या कामगिरीवर जर लक्ष केंद्रीत केलं तर आणि तरच ते उल्लेखनीय कामगिरी करु शकतात. अन्यथा श्रीलंकेला यावेळेच्या वर्ल्ड कपमध्ये खाली हातानंच मायदेशी परतण्याची वेळ येऊ शकते.