`टीम इंडियाची वर्ल्ड कपची तयारी पूर्ण, आता फक्त...`
आयपीएलची धामधूम संपल्यानंतर आता खेळाडूंना वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत.
मुंबई : आयपीएलची धामधूम संपल्यानंतर आता खेळाडूंना वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, आता फक्त इंग्लंडला जायचं बाकी आहे, असं वक्तव्य भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले, 'आमच्या टीममध्ये लवचिकता आहे, त्यामुळे कोणताही खेळाडू कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो.'
रवी शास्त्री हे क्रिकेटनेक्स्ट या वेबसाईटशी बोलत होते. 'तुम्हाला असे १५ खेळाडू हवे असतात जे कधीही आणि कुठेही खेळू शकतील, आमच्याकडे तसे खेळाडू आहेत. चौथ्या क्रमांकासाठीही आमच्याकडे बरेच पर्याय असल्यामुळे मला चिंता नाही', अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.
अंबाती रायुडू याच्याऐवजी निवड समितीने ऑलराऊंडर विजय शंकरला संधी दिली. पण आयपीएलमध्ये विजय शंकरची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. १५ मॅचमध्ये विजय शंकरने फक्त २४४ रनच केल्या.
'कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनी हे एकमेकांचा सन्मान करतात. दोघंही टीमच्या चांगल्यासाठी काम करतात. तसंच या दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे, त्यामुळे याबद्दल शंका घ्यायला जागा नाही. मला दोघांसाठी चांगलं काम करायचं आहे, कारण मी पहिल्यांदा टीम इंडियासोबत जोडला गेलो तेव्हा धोनी कर्णधार होता दुसऱ्यांदा टीममध्ये आलो तेव्हा कोहली कर्णधार आहे,' असं शास्त्री म्हणाले.
'धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत काय मिळवलं, हे जगाला माहिती आहे. त्याचं टीममध्ये असणंच मोठी गोष्ट आहे. बॅटिंगला जाताना धोनी शांत असतो. विकेट कीपिंग करतानाही धोनीला आपण सगळ्यांनी बघितलं आहे. धोनीकडून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता,' असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.
'ड्रेसिंग रूममध्ये वेगवेगळे खेळाडू असल्यामुळे सगळ्यांना मदत होते. टीममध्ये एकसारखेच खेळाडू असतील, तर काय होईल ते तुम्हालाही माहिती आहे. विराटकडे जुनून आहे, तर धोनीकडे धैर्य आहे. रोहित शिखरपेक्षा वेगळा असू शकतो. कुलदीप हार्दिकपेक्षा वेगळा असेल. तुम्हाला अशाच प्रकारची टीम पाहिजे', असं शास्त्रींना वाटतं.