World Cup 2019: श्रीलंकेचा धक्कादायक निर्णय, चक्क या खेळाडूला केलं कर्णधार
२०१९ च्या वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेने धक्कादायक निर्णय घेतला आहे.
कोलंबो : २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेने धक्कादायक निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने वनडे टीमचा नियमित सदस्य नसलेल्या खेळाडूला कर्णधार बनवलं आहे. भारतामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची जशी वनडे क्रिकेटमधली प्रतिमा आहे, तसाच श्रीलंकेचा हा खेळाडू आहे. दिमुथ करुणारत्नेला श्रीलंकेने वर्ल्ड कपसाठी कर्णधार बनवलं आहे. टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून ओळख असणाऱ्या ३० वर्षांच्या दिमुथ करुणारत्नेनं ९ वर्षांमध्ये ६० टेस्ट मॅच खेळल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तर त्याला फक्त १७ मॅच खेळण्याची संधी मिळाली आहे. दिमुथ करुणारत्नेनं आत्तापर्यंत एकही टी-२० मॅच खेळलेली नाही.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी १७ एप्रिलला वनडे टीमचा कर्णधार म्हणून दिमुथ करुणारत्नेची घोषणा केली असली, तरी टीमची निवड मात्र अद्याप झालेली नाही. ३० मेपासून इंग्लंडमध्ये या वर्ल्ड कपला सुरुवात होईल.
३० वर्षांचा दिमुथ करुणारत्नेनं २०१५ वर्ल्ड कपनंतर श्रीलंकेकडून एकही वनडे मॅच खेळली नाही. त्यामुळे करुणारत्नेला कर्णधार बनवण्याचा निर्णय हैराण करणारा आहे. करुणारत्नेनं श्रीलंकेकडून १७ वनडे मॅचमध्ये १५.८३ च्या सरासरीने १९० रन केले आहेत. करुणारत्नेचा सर्वाधिक स्कोअर ६० रन आहे. करुणारत्नेच्या नावावर एकच अर्धशतक आहे.
दिमुथ करुणारत्ने हा श्रीलंकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच ऐतिहासिक टेस्ट सीरिज जिंकली होती. श्रीलंकेने मागच्या चार सीरिज वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळल्या.
दिमुथ करुणारत्नेला कर्णधार बनवल्यामुळे अनुभवी फास्ट बॉलर लसिथ मलिंगा या रेसमधून बाहेर झाला आहे. या वर्ल्ड कपमध्ये मलिंगाकडे श्रीलंकेचं कर्णधारपद राहिल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आश्चर्याचा धक्का दिला आहे. करुणारत्नेला मागच्या महिन्यात एका अपघातानंतर नशेमध्ये गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याबद्दल करुणारत्नेला दंडही ठोठवण्यात आला होता.