World Cup 2019 : भारताच्या सगळ्यात ज्येष्ठ खेळाडूला संधी मिळणार?
५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. भारतीय टीम तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
मुंबई : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. भारतीय टीम तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या १५ भारतीय खेळाडूंमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचं योग्य मिश्रण आहे. सध्याच्या भारतीय टीममध्ये धोनी हा सगळ्यात अनुभवी खेळाडू असला तरी तो टीममधला ज्येष्ठ खेळाडू नाही. धोनीआधीच भारतीय टीममध्ये पदार्पण केलेला एक खेळाडू सध्या भारतीय टीममध्ये आहे.
दिनेश कार्तिक हा मागच्या १४ वर्षांपासून भारतीय टीमकडून खेळत आहे. पण अजूनही त्याला एकदाही वर्ल्ड कपचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यावेळीही दिनेश कार्तिकला खेळण्याची संधी मिळेल का? याबाबत शंका आहे.
दिनेश कार्तिक हा सध्याच्या भारतीय टीममधला सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू आहे. दिनेश कार्तिक जेव्हा भारताकडून पहिली मॅच खेळला तेव्हा विराट कोहली ज्युनियर क्रिकेट खेळत होता, तर धोनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता. २००७ च्या वर्ल्ड कप टीममध्येही दिनेश कार्तिक भारतीय टीमसोबत होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतरच्या दोन वर्ल्ड कपला कार्तिक मुकला होता.
भारतीय टीममध्ये सध्या सगळ्यात जास्त कालावधी असलेली कारकिर्द दिनेश कार्तिकची आहे. १४ वर्ष आणि १४८ दिवसांआधी दिनेश कार्तिक भारताकडून पहिली मॅच खेळला होता. यानंतर दुसरा क्रमांक धोनीचा लागतो. धोनीची कारकिर्द १४ वर्ष ७५ दिवसांची आहे. यादरम्यान धोनीने ३४१ मॅच खेळल्या आहेत. सर्वाधिक मॅच खेळण्याच्या बाबतीत धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीने २ वर्ल्डकपमध्ये भारताचं नेतृत्व केलं, यातल्या एका वर्ल्डकपमध्ये भारताचा विजय झाला. दिनेश कार्तिकने त्याच्या १४ वर्ष आणि १४८ दिवसांच्या कारकिर्दीत फक्त ९१ मॅच खेळल्या आहेत.
शोएब मलिक सगळ्यात ज्येष्ठ
या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक काळ क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये पहिला क्रमांक शोएब मलिकचा लागतो. शोएब मलिकची कारकिर्द १९ वर्ष २१७ दिवसांची आहे. यानंतर वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा (१९ वर्ष १७२ दिवस) नंबर लागतो. मशरफे मुर्तजा, मोहम्मद हाफीज, लसिथ मलिंगा आणि जेपी ड्युमिनी यांची कारकिर्द दिनेश कार्तिकपेक्षा जास्त काळ चालली आहे.