World Cup 2019 : `पाकिस्तान नको म्हणून, भारत बांगलादेश-श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल`
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.
मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या टीम सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची टीम १२ पॉईंट्ससह आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. तर भारत आणि न्यूझीलंड यांचे प्रत्येकी ११ पॉईंट्स असल्यामुळे त्यांचाही सेमी फायनल प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या टीममध्ये स्पर्धा आहे.
सेमी फायनलच्या चौथ्या क्रमांकाच्या टीमसाठीची स्पर्धा रोमांचक झालेली असतानाच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासीत अली यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. क्रिकेट आता अनिश्चिततांचा खेळ राहिला नाही. सगळ्या गोष्टी फिक्स असतात. भारताला पाकिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये नको. त्यामुळे ते बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम मॅच हारतील, असा आरोप बासीत अली यांनी केला.
पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीतल्या एका कार्यक्रमात बासीत अली यांनी हे आरोप केले. बासीत अली एवढ्यावरच थांबले नाहीत तर १९९२ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची टीम पाकिस्तानविरुद्ध मुद्दाम हरली होती. कारण त्यांना सेमी फायनल स्वत:च्या देशात खेळायची होती, असंही बासीत अली म्हणाले.
काय आहे पॉईंट्स टेबलची स्थिती?
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रबळ दावेदार असणारी इंग्लंड आता करो या मरो स्थितीमध्ये आहे. तर पाकिस्तानची अवस्थाही तशीच आहे.
इंग्लंडला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागतील. इंग्लंडच्या या दोन मॅच भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आहे. ८ पॉईंट्ससह इंग्लंड सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.
सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी इंग्लंडबरोबरच पाकिस्तानची टीमही शर्यतीत आहे. भारताविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडचा पराभव झाला तर याचा थेट फायदा पाकिस्तानला होऊ शकतो.
पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानची टीम ७ पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा ७ मॅचपैकी ३ मॅचमध्ये विजय आणि ३ मॅचमध्ये पराभव झाला, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर पाकिस्तानचे ११ पॉईंट्स होतील आणि इंग्लंडचा एका मॅचमध्ये पराभव झाला तर ते जास्तीत जास्त १० पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकतात. पाकिस्तानच्या उरलेल्या मॅच या बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही मॅचमध्ये पाकिस्तानला विजयाचा विश्वास आहे.
सेमी फायनलच्या रेसमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तानसोबतच बांगलादेश आणि श्रीलंकेच्या टीमही आहेत. बांगलादेशने ७ मॅचपैकी ३ मॅचमध्ये विजय आणि ३ मॅचमध्ये पराभव पत्करला. बांगलादेशची एक मॅच पावसामुळे रद्द झाली. श्रीलंकेने ६ मॅचपैकी २ मॅच जिंकल्या आणि २ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर २ मॅच पावसामुळे रद्द झाल्या. श्रीलंकेच्या खात्यात सध्या ६ पॉईंट्स आहेत. उरलेल्या सगळ्या मॅच जिंकून श्रीलंका १२ पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकते.