मुंबई : इंग्लंडमध्ये सुरू होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. यासाठी भारतीय टीममध्ये कोणाची निवड होईल हे जवळपास निश्चित आहे. पण टीममधल्या काही जागांसाठी अजूनही चुरस सुरू आहे. भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अजूनही वर्ल्ड कप टीममध्ये निवडीची आशा आहे. तसंच मला ५० ओव्हरच्या क्रिकेटमध्ये सातत्यानं संधी देण्यात यावी, अशी मागणी अजिंक्य रहाणेनं केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरापासून अजिंक्य रहाणे भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये नाही. पण टेस्ट टीममध्ये मात्र अजिंक्य रहाणेचं स्थान पक्कं आहे. वनडेमध्ये अजिंक्य रहाणेनं ७८.६३ च्या सरासरीनं रन केले आहेत. 'खेळाडू म्हणून मी आक्रमक आहे. बोलण्यापेक्षा मी बॅटनेच उत्तर देतो. पण काहीवेळा सत्य बोलावं लागतं,' अशी प्रतिक्रिया रहाणेनं दिली. रहाणे हा सध्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये मुंबईचं नेतृत्व करत आहे.


'टीमचं प्राधान्य माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी निवड समितीचा आदरही करतो आणि करत राहिनं. पण तुमच्या कामगिरीची दखल घेणं महत्त्वाचं आहे. मी जर प्रत्येकवेळी टीमसाठी खेळलो असीन, तर मला सातत्यानं संधी मिळाली पाहिजे. मी एवढीच मागणी करतो आहे,' असं रहाणे म्हणाला.


२०१७ साली वेस्ट इंडिजमध्ये रहाणेला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. यानंतर रहाणेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच वर्षी घरच्या मैदानात लागोपाठ ४ अर्धशतकं केली. पण २०१८ साली दक्षिण आफ्रिकेत अजिंक्य रहाणेला रोहित, शिखर आणि विराटनंतर बॅटिंगला पाठवण्यात आलं.


'माझी कामगिरी चांगली होती. शेवटच्या तीन-चार सीरिजमध्ये मी ४५-५० च्या सरासरीनं रन केले होते. यानंतर मला टीममधून काढून टाकण्यात आलं. यानंतर मी स्थानिक क्रिकेट खेळलो आणि तिकडेही चांगली कामगिरी केली,' असं वक्तव्य रहाणेनं केलं.


'माझ्या वैयक्तिक कामगिरीचा मी कधीही विचार केला नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आणि वेस्ट इंडिजमध्ये मी ओपनर म्हणून चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेमध्ये मी चौथ्या क्रमांकावर योग्य असल्याचं टीम प्रशासनाला वाटलं. तुम्ही जे म्हणाल त्याला प्राधान्य देईन कारण टीमची ती गरज आहे, असं मी म्हणालो. पण प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वासाची गरज असते. तुम्ही तिकडे आहात आणि तुम्ही हे सगळं टीमसाठी करत आहात', असं रहाणेनं सांगितलं.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहणेची निवड झाली नाही. पण निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रहाणे हा वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमच्या विचारात आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरही रहाणेनं प्रतिक्रिया दिली. 'माझा विचार होत आहे, हे ऐकून चांगलं वाटलं. पण तुम्हाला संधीही दिली गेली पाहिजे. वर्ल्ड कप खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी निवड समितीचा आदर करतो, पण मी संधीच्या लायक आहे. मी आशावादी आहे,' असं रहाणे म्हणाला.