World Cup 2019 : ...तर क्रिकेटमधून निवृत्ती घेईन, अफगाणिस्तानच्या खेळाडूचे बोर्डावर आरोप
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजाद याने त्यांच्या क्रिकेट बोर्डाला निवृत्तीचा इशारा दिला आहे.
लंडन : अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद शहजाद याने त्यांच्या क्रिकेट बोर्डाला निवृत्तीचा इशारा दिला आहे. वर्ल्ड कपमधल्या पहिल्या दोन मॅचनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शहजाद फिट नसल्याचं घोषित केलं. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शहजाद उरलेला वर्ल्ड कप खेळू शकणार नाही, असं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं.
मोहम्मद शहजाद याने मात्र आपण थोड्याच दिवसात फिट होऊ असा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्याचा दावा केला आहे. जर त्यांना मला क्रिकेट खेळून द्यायचं नसेल, तर मी निवृत्ती घेईन, असं मोहम्मद शहजाद याने भावूक होऊन, इएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटशी बोलताना सांगितलं.
'जर बोर्डाला माझ्याबद्दल अडचण असेल, तर मी यापुढे खेळणार नाही. या निर्णय घेण्याआधी त्यांनी माझ्यासोबत बोलायला हवं होतं. लंडनमध्ये मी डॉक्टरांशी बोललो तेव्हा, त्यांनी मला २-३ दिवसात फिट होईन, असं सांगितलं. २०१५ वर्ल्ड कपवेळीही मला टीममधून काढून टाकण्यात आलं. क्रिकेटमध्ये आता माझं मन रमत नाही, त्यामुळे मी कुटुंब आणि मित्रांशी चर्चा करणार आहे,' असं मोहम्मद शहजाद म्हणाला.
३२ वर्षांच्या मोहम्मद शहजादने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये ७ रन केले होते.
मोहम्मद शहजाद हा अफगाणिस्तानचा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. मोहम्मद शहजादने वनडे क्रिकेटमध्ये २,७२७ रन केले आहेत. योग्य फिटनेस नसल्यामुळे शहजादला २०१५ वर्ल्ड कपच्या टीममधूनही डच्चू देण्यात आला होता. २०१७ साली डोपिंगमुळे शहजादवर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.
मोहम्मद शहजादच्या या आरोपांवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रतिक्रिया दिली आहे. 'मोहम्मद शहजादचे आरोप चुकीचे आहेत. फिट खेळाडूंना संधी देणं, ही आमची प्राथमिकता आहे. शहजाद फिट नसल्याचा रिपोर्ट आम्ही आयसीसीला दिला आहे. या रिपोर्टची छाननी करूनच आयसीसीने आम्हाला बदली खेळाडूसाठी परवानगी दिली आहे. फिट नसलेल्या खेळाडूंना आम्ही सोबत ठेवू शकत नाही. फिट नसतानाही शहजाद २ मॅच खेळला, याचा स्वीकार होऊ शकत नाही,' असं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ असदुल्लाह खान म्हणाले.
मोहम्मद शहजादऐवजी अफगाणिस्तानने १८ वर्षांच्या इक्रम अली खिल याला संधी दिली आहे. अफगाणिस्तानचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेशी शनिवारी कार्डिफमध्ये खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही टीमना यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अजून एकही विजय मिळवता आलेला नाही.