World Cup 2019 : शमीच्या हॅट्रिकने टीम इंडियाचा निसटता विजय
मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय झाला आहे.
साऊथम्पटन : मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या २२५ रनचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा ४९.५ ओव्हरमध्ये २१३ रनवर ऑल आऊट केला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मोहम्मद शमीने ५०व्या ओव्हरच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या बॉलला विकेट घेतल्या. वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा मोहम्मद शमी हा दुसरा भारतीय आहे. याआधी चेतन चौहान यांनी १९८७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये नागपूरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधला हा ५०वा विजय होता.
अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने ५५ बॉलमध्ये सर्वाधिक ५२ रनची खेळी केली. या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला असला तरी अफगाणिस्तानने मात्र टीम इंडियाच्या नाकी नऊ आणले होते. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत टीम इंडियाने सगळ्या मॅच जिंकल्या असल्या तरी ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी धोक्याची घंटा ठरली आहे.
या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये २२४/८ पर्यंतच मजल मारली. अफगाणिस्तानच्या स्पिनरपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनना संघर्ष करावा लागला.
पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला. मुजीब उर रहमानच्या शानदार बॉलवर रोहित बोल्ड झाला. यानंतर केएल राहुल आणि विराटने टीम इंडियाचा डाव सावरायला सुरुवात केली. पण चुकीच्या वेळी खराब शॉट खेळून राहुल माघारी परतला. मोहम्मद नबीच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा राहुलने प्रयत्न केला.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरने विराटसोबत पार्टनरशीप केली, पण ४१ बॉलमध्ये २९ रन करून शंकर आऊट झाला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने ६३ बॉलमध्ये सर्वाधिक ६७ रन केले. तर केदार जाधवने ६८ बॉलमध्ये ५२ रनची खेळी केली. धोनीने ५२ बॉलमध्ये २८ रन केले.
अफगणिस्तानकडून कर्णधार गुलबदीन नायब आणि मोहम्मद नबीला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर मुजीब, आफ्ताब आलम, राशिद खान आणि रहमत शाह यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.