वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? अजूनही घोळ कायम
भारतीय टीमनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.
मुंबई : भारतीय टीमनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या दौऱ्यामुळे एमएस धोनी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आणि तिसऱ्या फास्ट बॉलरच्या रुपात भारताला मोहम्मद शमीचा पर्याय मिळाला. मे महिन्यापासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपआधी धोनी आणि मोहम्मद शमीनं भारतीय टीमच्या चिंता कमी केल्या आहेत. पण चौथ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार याबद्दलचा घोळ अजूनही कायम आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी वनडे सीरिजदरम्यान भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं चौथ्या क्रमांकाबद्दल चर्चा केली. अंबाती रायुडू हा चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी योग्य असल्याचं विराट म्हणाला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे दरम्यान अंबाती रायुडूनं स्वत:ला सिद्ध केलं. भारताच्या सुरुवातीच्या विकेट लवकर गेल्यानंतर अंबाती रायुडूनं भारताच्या डावाला आकार दिला. या मॅचमध्ये रायुडूनं ९० रनची खेळी केली. अंबाती रायुडूनं आत्तापर्यंत ५२ वनडे मॅचमध्ये ५०.३३ च्या सरासरीनं १६६१ रन केल्या आहेत. यातल्या बहुतेक रन या चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करतानाच्या आहेत.
रायुडूच्या या कामगिरीवर विराट खुश असला तरी भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि उपकर्णधार रोहित शर्मानं चौथ्या क्रमांकाविषयी वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं जाऊ शकतं, असे संकेत रवी शास्त्रींनी दिले होते. तर चौथ्या क्रमांकासाठी धोनी योग्य असल्याचं मत रोहित शर्मानं मांडलं होतं. आता न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर एमएसके प्रसाद यांनी ऋषभ पंत, विजय शंकर आणि अजिंक्य रहाणे वर्ल्ड कपच्या शर्यतीत असल्याचं म्हणलं.
वर्ल्ड कपसाठीची टीम जवळपास निश्चित झाल्याची प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिली होती. रवी शास्त्रींच्या त्या टीममध्ये विजय शंकर आणि अजिंक्य रहाणेचं नाव नव्हतं. पण एमएसके प्रसाद यांच्या विधानामुळे कोणातच एकमत नसल्याचं दिसत आहे. ऋषभ पंतनं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली होती.
२०१५ सालच्या वर्ल्ड कपनंतर भारतानं चौथ्या क्रमांकावर १० पेक्षा जास्त खेळाडूंना संधी दिली. तरीदेखील भारताला अजून पाहिजे तसा बॅट्समन सापडत नाहीये. भारतीय टीममध्ये सुरु असलेल्या घोळामुळे चौथ्या क्रमांकावर नक्की कोण खेळणार, याचं उत्तर वर्ल्ड कप सुरु झाल्यावरच मिळेल.
वर्ल्ड कपमध्ये धोनी-रायुडू नाही, तर विराट चौथ्या क्रमांकावर? शास्त्रींचे संकेत