मुंबई : यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता अवघे काही महिने उरले आहेत. ३० मेपासून इंग्लंडमध्ये या वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून चौथ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार याबद्दल चर्चा सुरु आहे. अंबाती रायुडू किंवा एमएस धोनी यांना चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात यावं, असं मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. अंबाती रायुडूनंही मागच्या वर्षभरात बरेच वेळा चौथ्या क्रमांकावरच बॅटिंग केली आहे. चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना रायुडू यशस्वीही राहिला. पण भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली खेळू शकतो, असे संकेत दिले आहेत.
विराट कोहली हा वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर तर टेस्टमध्ये चौथ्या क्रमांकवर बॅटिंग करतो. न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी-२० सीरिज आणि त्यानंतर आयपीएल खेळणार आहे. या सगळ्या स्पर्धा भारतात होणार आहेत. तर वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार असल्यामुळे तिथलं वातावरण भारतापेक्षा वेगळं असेल, अशावेळी विराट कोहलीला सुरक्षित स्थान देणं महत्त्वाचं असल्याचं मत शास्त्रींनी मांडलं
क्रिकबझशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, 'वातावरण आणि परिस्थिती तशी असेल तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. विराट चौथ्या क्रमांकावर आला तर आम्ही तिसऱ्या क्रमांकावर वेगळ्याच बॅट्समनला संधी देऊ, पण हे सगळं इंग्लंडमधल्या वातावरणावर अवलंबून आहे.'
कोहलीला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं तर अंबाती रायुडू हा तिसऱ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचं शास्त्रींना वाटतं. मागच्या वर्षभरातली चौथ्या क्रमांकावर केलेली सातत्यपूर्ण कामगिरी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये कठीण परिस्थितीमध्ये केलेली ९० रनची खेळी यामुळे रायुडूला वर्ल्ड कपमध्ये आणखी जबाबदारी मिळू शकते.
वर्ल्ड कपमध्ये रायुडू तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येईल का? असा प्रश्न शास्त्रींना विचारण्यात आला. तेव्हा 'हो रायुडू किंवा दुसरा कोणी खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. पण ओपनिंग बॅट्समनमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.' असं उत्तर शास्त्रींनी दिलं.
इंग्लंडमधलं तेव्हाचं वातावरण बघितल्यानंतर याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शास्त्रींनी स्पष्ट केलं. 'वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचा स्कोअर १८-३ किंवा १६-४ असा असता कामा नये. वनडे सीरिजवेळची गोष्ट वेगळी असते, पण वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेवळी जर वातावरण बॉलरना अनुकूल असेल, तर मी माझा सर्वोत्तम बॅट्समनची विकेट सुरुवातीलाच का देऊ?' असा प्रश्न शास्त्रींनी उपस्थित केला.