नॉटिंगहम : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा तिसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मागच्या मॅचमध्ये शतक करणारा शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शिखर धवनच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची ओपनिंग जोडी प्रभावित होणार आहे. शिखर धवन नसल्यामुळे त्याच्याजागी रोहित शर्माबरोबर केएल राहुल ओपनिंगला खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. हे दोघं पहिल्यांदाच एकमेकांसोबत वनडेमध्ये ओपनिंगला बॅटिंगला उतरतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांनी या वर्ल्ड कपमध्ये अजून एकही मॅच गमावलेली नाही. टीम इंडियाने पहिले दक्षिण आफ्रिका आणि मग ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. तर न्यूझीलंडने श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.


चौथ्या क्रमांकावर विजय शंकर?


या मॅचमध्ये केएल राहुल ओपनिंगला खेळणार असल्यामुळे चौथ्या क्रमांकावर विजय शंकरला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. मॅचच्या एक दिवस आधी विजय शंकरने नेटमध्ये बॅटिंगचा सराव केला. पण विजय शंकरने एकदाही या क्रमांकावर बॅटिंग केलेली नाही. केदार जाधवने चौथ्या क्रमांकावर ३ वेळा बॅटिंग करून १८ रन केले आहेत. तर दिनेश कार्तिकने या क्रमांकावर १८ इनिंगमध्ये ४२६ रन केले आहेत.


वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात ७ मॅच झाल्या, यातल्या ४ मॅचमध्ये न्यूझीलंडचा आणि ३ मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. न्यूझीलंडचं पारडं जड असलं तरी तीन महिन्यांआधी टीम इंडियाने न्यूझीलंडचा त्यांच्याच घरात पराभव केला होता.


वर्ल्ड कप आधीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्या मॅचमध्ये ट्रेन्ट बोल्टने टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर अडचणी निर्माण केल्या होत्या. बोल्टने टीम इंडियाच्या ४ विकेट घेतल्या होत्या. यामुळे न्यूझीलंडचा या मॅचमध्ये ४ विकेट घेतल्या होत्या. गुरुवारी ढगाळ वातावरण राहिलं तर बोल्ट आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बोल्टपासून टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे.


वर्ल्ड कपचा हा मुकाबला ट्रेन्ट ब्रीजमध्ये खेळवला जाणार आहे. मागच्या तीन दिवसांपासून इकडे रोज पाऊस पडत आहे. गुरुवारीही भारत-न्यूझीलंड मॅचदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ट्रेन्ट ब्रीजचा मोसम जर असाच राहिला तर टीम इंडिया मोहम्मद शमीच्या रुपात आणखी एक फास्ट बॉलरला संधी देऊ शकते. शमीला संधी दिली तर चहल किंवा कुलदीपला टीमबाहेर ठेवावं लागू शकतं.