मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण वर्ल्ड कपआधीच दक्षिण आफ्रिकेच्या टीमला आणखी एक झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिच नोर्टजे दुखापतीमुळे वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. २५ वर्षांचा नोर्टजे दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कपसाठीच्या १५ खेळाडूंमध्ये सामील होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या तीन महिन्यांमध्ये एनरिच नोर्टजे दुसऱ्यांदा दुखापतग्रस्त झाला आहे. मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजदरम्यान नोर्टजेच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे नोर्टजे आयपीएलमध्येही खेळू शकला नव्हता. कोलकात्याची टीमने नोर्टजेला विकत घेतलं होतं. पण वर्ल्ड कपआधी फिट झाल्यामुळे नोर्टजेची टीममध्ये निवड करण्यात आली होती.


पोर्ट एलिजाबेथमध्ये सराव करताना नोर्टजेच्या अंगठ्याला दुखापत झाली. लगेचच त्याला डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी अंगठ्यावर शस्त्रक्रिया करायला सांगितली. पण नोर्टजेला फिट व्हायला दोन महिन्यांचा वेळ लागणार आहे. या कारणासाठी त्याला वर्ल्ड कप टीममधून बाहेर करण्यात आलं आहे.



२५ वर्षांच्या एनरिच नोर्टजेची आंतरराष्ट्रीय कारकिर्द याचवर्षी ३ मार्चला सुरू झाली होती. आत्तापर्यंत त्याने फक्त ४ वनडे मॅच खेळल्या आहेत, यामध्ये त्याने ८ विकेट घेतल्या आहेत. नोर्टजेच्याऐवजी क्रिस मॉरिसची दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड होऊ शकते. मॉरिस हा सध्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळत आहे.


दक्षिण आफ्रिकेचे डेल स्टेन, कागिसो रबाडा आणि जेपी ड्युमिनी हे खेळाडूही दुखापतग्रस्त आहे. डेल स्टेन आणि कागिसो रबाडाला आयपीएल सोडून दक्षिण आफ्रिकेला जावं लागलं होतं. आयपीएलमध्ये डेल स्टेन बंगळुरूकडून आणि रबाडा दिल्लीकडून खेळला होता.