साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन्ही स्पिनरना संधी मिळू शकते. पण इंग्लंडमधल्या बदलत्या वातावरणामुळे टीम व्यवस्थापनाला बॉलरची निवड करणं डोकेदुखी ठरू शकते. त्यातच भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह याची डोप टेस्टची चाचणी घेण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी टीम इंडिया साऊथम्पटनमध्ये सराव करत असताना वर्ल्ड ऍण्टी डोपिंग एजंसी (वाडा) चे अधिकारी बुमराहकडे आले आणि त्याला डोपिंग टेस्टची चाचणी द्यायला सांगितलं. नियमांनुसार आयसीसी स्पर्धेमध्ये (वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० वर्ल्ड कप) खेळाडूंची डोप टेस्ट होऊ शकते.


डोपिंग टेस्टसाठी पहिले बुमराहची युरिन टेस्ट घेण्यात आली, यानंतर ४५ मिनिटांनी बुमराहने वाडाच्या अधिकाऱ्यांना रक्त दिलं. बीसीसीआयमधल्या सूत्रांनी बुमराहची डोप टेस्ट झाल्याचं मान्य केलं आहे.


बुमराहकडून सर्वाधिक अपेक्षा


टीम इंडियाला या वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. बुमराह हा टीम इंडियाचा हुकमी एक्का आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्येही बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. बुमराह हा पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळत आहे.


पाटा खेळपट्टीची शक्यता


साऊथम्पटनच्या एजिस बाऊस स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामन रंगणार आहे. या मैदानातली खेळपट्टी पाटा असेल, असं बोललं जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समनची स्पिनर्सविरुद्ध खेळतानाची कमजोरी बघता विराट कोहली चहल आणि कुलदीप या दोघांना संधी देण्याची शक्यता आहे. बुधवारी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला बाहेर ठेवण्याचा धोका टीम इंडिया पत्करणार नाही, अशात बुमराह, शमी आणि भुवनेश्वर हे ३ फास्ट बॉलर खेळू शकतात.