मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमामध्ये मुंबईची टीम चॅम्पियन ठरली. फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा पराभव केला. याचबरोबर मुंबईने सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. यातल्या दोन वेळा महेला जयवर्धने हा मुंबईच्या टीमचा प्रशिक्षक होता. महेला जयवर्धनेला श्रीलंकेच्या टीमने प्रशिक्षक होण्याची ऑफर दिली होती, पण श्रीलंका क्रिकेटची सध्याची परिस्थिती बघता महेला जयवर्धनेने ही ऑफर नाकारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेला जयवर्धने क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, 'मला निमंत्रण देण्यात आलं होतं, पण यापेक्षा जास्त महत्त्वाची कामं माझ्याकडे आहेत. माझ्याकडून ज्या भूमिकेच्या अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या, मला त्या समजल्या नाहीत. मला आता यामध्ये सामिल करण्यात काहीच अर्थ नाही. टीमची निवड करण्यात आली आहे आणि सगळं झालं आहे. आता माझ्यासाठी यामध्ये जागा नाही.'


'मी टीमसोबत छोट्या योगदानासाठीही खूश आहे, पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाबरोबर मी काहीही करणार नाही. काही गोष्टी आहेत, ज्या मी स्वत:ला सांगितल्या आहेत. कोणासाठीही काम सुरु करणाऱ्यातला मी नाही. खासकरून जेव्हा माझ्यासाठी ती योग्य जागा नसल्याचं मला माहिती आहे,' असं महेला जयवर्धने म्हणाला.


याआधी जयवर्धनेने श्रीलंकेतल्या स्थानिक क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याची आपली योजना दिली होती, पण ही योजना अयशस्वी ठरली. वारंवार कर्णधार बदलले जाण्यावरही जयवर्धनेने नाराजी जाहीर केली आणि सगळे राजकारणाचे शिकार ठरल्याचा आरोप केला.


जयवर्धनेने २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर एंजलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, थिसारा परेरा, लसिथ मलिंगा, चमारा कपुगदेरा आणि दिमुथ करुणारत्ने यांना कर्णधार करण्यात आलं.


'मी आणि कुमार संगकाराने फक्त एवढाच सल्ला दिला होता, की एंजलोने क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. त्याला एक मजबूत कर्णधार बनण्याची गरज होती. पण त्याने क्रिकेटला राजकारणाशी जोडलं. त्याने इतरांना निर्णय घ्यायचा अधिकार दिला,' असं वक्तव्य महेला जयवर्धनेने केलं.