World Cup 2019 : म्हणून पाकिस्तानी चाहत्याकडून सरफराज अहमदची माफी
यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला.
लंडन : यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर पाकिस्तानच्या टीमवर त्यांच्या चाहत्यांनी जोरदार टीका केली. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा ४९ रननी विजय झाला. या विजयानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा मूड काही बदललेला दिसला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचदरम्यान पाकिस्तानी टीमचा चाहता एक पोस्टर घेऊन उभा होता. या पोस्टरवर 'सरफराज आम्हाला माफ कर', असं लिहिण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे चाहते खुश झाले आहेत. मैदानातल्या पाकिस्तानी प्रेक्षकांनी तर कर्णधार सरफराज अहमदची सही देखील घेतली. आयसीसीने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली होती. यानंतर सरफराज, शोएब मलिक आणि मोहम्मद आमिर यांनीही कुटुंबांवर टीका करु नका, आमच्या खेळावर टीका करा, असं आवाहन केलं होतं.
या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे ६ मॅचमध्ये ५ पॉईंट्स आहेत. आता पाकिस्तानच्या मॅच न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. या तिन्ही मॅच जिंकल्यास पाकिस्तानच्या खात्यात ११ पॉईंट्स होतील. तरी पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागू शकतं.