World Cup 2019 : आयपीएलचा खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम, टीम इंडियाच्या ट्रेनरचा निशाणा
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
साऊथम्पटन : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवन हा वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. शिखर धवनऐवजी ऋषभ पंतला संधी देण्यात येणार आहे. शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीतून १०-१२ दिवसांमध्ये बरा होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता, पण धवनची दुखापत बरी व्हायला जास्त काळ लागणार आहे. त्यामुळे धवनला बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिखर धवनबरोबरच टीम इंडियाला भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसचीही चिंता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये बॉलिंग करताना भुवनेश्वरच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला. यामुळे बॉलिंग अर्ध्यात सोडून भुवनेश्वर निघून गेला. या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला एक-दोन मॅचला मुकावं लागेल, असं विराटने सांगितलं होतं. पण आता टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बसू यांनी भुवनेश्वरच्या फिटनेसविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शिखर धवनच्या दुखापतीबद्दलच्या पत्रकार परिषदेमध्ये शंकर बसू बोलत होते. या पत्रकार परिषदेत शंकर बसू यांनी आयपीएलच्या वेळापत्रकावरही निशाणा साधला. तुम्हाला आवडो अगर न आवडो पण आयपीएलच्या वेळांचा खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतो. आयपीएलदरम्यान खेळाडू २-३ वाजता झोपतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ट्रेनिंगला येणं हे खेळाडूंसाठी आव्हान असतं. खेळाडूंना झोपेची आणि उठायच्या वेळेचं, पोषक आहार आणि ट्रेनिंगचं महत्त्व कळतं, असं शंकर बसू म्हणाले.