लंडन : भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने संजय मांजरेकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मी तुझ्यापेक्षा दुप्पट मॅच जास्त खेळलो आहे, आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी काही साध्य केलं आहे त्यांचा आदर करायला शिका. तुझी वाचाळ बडबड खूप ऐकली, असं ट्विट जडेजाने केलं आहे. या ट्विटमध्ये जडेजाने संजय मांजरेकरांच्या बोलण्याची तुलना डायरियाशी केली आहे.



काय म्हणाले होते संजय मांजरेकर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र जडेजा हा 'बिट्स ऍण्ड पिसेस' खेळाडू असल्याचं संजय मांजरेकर म्हणाले होते. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये खराब कामगिरी केली. यानंतर एका स्पिनरला काढून जडेजाला संधी द्यावी का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा 'मी थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करु शकणाऱ्या जडेजासारख्या खेळाडूंचा चाहता नाही. जडेजा हा सध्या त्याच्या ५० ओव्हरच्या कारकिर्दीमध्ये असा खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र तो पूर्ण बॉलर आहे. ५० ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मी टीममध्ये बॅट्समन आणि स्पिनरना संधी देईन', असं मांजरेकर म्हणाले होते.


इंग्लंडविरुद्धच्या मॅचनंतर आणि बांगलादेशविरुद्धच्या मॅचआधी मांजरेकर यांनी हे वक्तव्य केलं होतं. 'भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव होणं ही अपवादात्मक गोष्ट होती. तसंच स्पिनरनी रन देणं हादेखील अपवाद होता,' अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली होती.


९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मांजरेकर यांनी ३७ टेस्ट आणि ७४ वनडे मॅच खेळल्या. मांजरेकर यांनी टेस्टमध्ये २,०४३ रन आणि वनडेमध्ये १,९९४ रन केले. १९९७ साली मांजरेकर यांनी निवृत्ती घेतली आणि कॉमेंटेटर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये मांजरेकर कॉमेंट्री करत आहेत.


रवींद्र जडेजाने ४१ टेस्टमध्ये ३२.२८ च्या सरासरीने १,४८५ रन केले आहेत आणि १९२ विकेट घेतल्या आहेत. तर १५१ वनडेमध्ये त्याने २९.९३ च्या सरासरीने २,०३५ रन केले आणि १७४ विकेट घेतल्या.